नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज ६० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी मागील २४ तासात देशातील करोनाचे ६८,८९८ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या २९ लाखांच्या पुढे गेली आहे. देशासाठी हा चिंतेचा विषय असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे असल्याने समाधानकारक चित्र देखील आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २१ लाखांच्या पुढे गेली आहे. जगाच्या तुलनेत भारतातील रिकव्हरी रेट जास्त आहे. आजच्या स्थितीत भारतातील रिकव्हरी रेट ७४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सध्या देशात २३.८२ टक्के रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.
देशातील बाधितांची एकूण संख्या २९,०५,८२४ झाली आहे. यापैकी ६,९२,०२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच २१,५८,९४७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात २० ऑगस्टपर्यंत एकूण ३ कोटी ३४ लाख ६७ हजार २३७ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यांपैकी गुरुवारी एका दिवसांत ९,१८,४७० नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये पॉझिटिव्हिटीचा दर आठ टक्क्यांपेक्षा कमी आहे.