पुणे । शहरातील बहुचर्चित 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी, पाणीमीटर आणि फायबर ऑप्टिकल केबलसाठी डक्ट टाकणे या कामासाठीच्या निविदेत जॉइन्ट व्हेंचर करण्यास मान्यता दिल्यानंतरही अल्पप्रतिसाद मिळाला आहे. या कामाच्या एकूण सहा टप्प्यांपैकी पहिला आणि चौथ्या टप्प्याच्या कामासाठी केवळ दोनच निविदा आल्या आहेत. त्यामुळे या कामाला आठ ‘वर्किंग डे’ म्हणजे 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता उर्वरित दुसरा, तिसरा, पाचवा आणि सहाव्या टप्प्यातील कामासाठी देखील 15 जानेवारीपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
पूर्वगणनपत्रक 2 हजार 615 कोटींचे
24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी एसजीआय या इटालियन कंपनीने जलवाहिनी, पाणीमीटर आणि फायबर ऑप्टिकल केबलसाठी डक्ट टाकणे या तिन्ही कामांचे एकत्रित पूर्वगणनपत्रक (एस्टीमेट) 2 हजार 615 कोटींचे तयार करण्यात केले होते. त्यानुसार मागविलेल्या निविदामध्ये रिंग (संगनमत) झाल्यामुळे त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावर या योजनेच्या कामात डक्टचा समावेश करून 2 हजार 325 कोटींच्या एकत्रित पूर्वगणनपत्रकाला इस्टिमेट कमिटीने दिली होती. त्यात तब्बल 290 कोटींनी इस्टिमेट कमी झाली होते. 2 हजार 325 कोटींच्या पूर्वगणनपत्रकाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
कामाचे एकूण सहा टप्प्यांत विभाजन
या निविदा भरण्याची अंतिम मुदत 28 डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. आता त्यात वाढ करून निविदा भरण्याची अंतिम मुदत 5 जानेवारी करण्यात आली होती. या योजनेच्या कामाचे एकूण सहा टप्प्यांत विभाजन करण्यात आले आहे. निविदापूर्व बैठकीत सहभागी कंपन्यांनी जॉइन्ट व्हेन्चरची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी या निविदेत जॉइन्ट व्हेन्चर करण्यास मान्यता दिली. या निविदेची मुदत वाढून पाच जानेवारी करण्यात आली होती.
एल अॅन्ड टी, लक्ष्मी व एसपीएमएल…
पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा झोनच्या 295 कोटीचे काम आणि चौथ्या टप्पातील कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्राचा झोनच्या कामासाठी 319 कोटीच्या कामासाठी केवळ दोन निविदा आल्या आहेत. या कामासाठी तीन निविदा येणे अपेक्षित होते. पण केवळ दोनच निविदा आल्याने या कामाला आठ वर्किंग डे म्हणजे 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती मात्र उर्वरित दुसरा भामा आसखेड जलशुद्धीकरण केन्द्र झोन 319 कोटीच्या कामासाठी एल अॅन्ड टी, लक्ष्मी, एसपीएमएल या तीनच निविदा आल्या आहेत.
वारजे आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्र
तिसर्या टप्पातील वारजे आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्र झोनच्या 542 कोटीच्या कामासाठी एल अॅन्ड टी, एसपीएमएल आणि जैन एरिगेशन यांच्या निविदा आल्या आहेत. पाचव्या टप्प्यातील वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या 469 कोटीच्या कामासाठी एल अन्ड टी, एसपीएमएल आणि जैन एरिगेशनच्या निविदा आल्या आहेत. सहाव्या टप्प्यातील कामासाठी ट्रान्समिशन सिस्टीमच्या कामासाठी 261 कोटीच्या कामासाठी पटेल इंजिनिअरींग, टाटा, एल अॅन्ड टी, एसएमसी, जैन एरिगेशन, कोया, लक्ष्मी सिव्हिल सात निविदा आल्या आहेत. मात्र, आता सर्व निविदांसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.