समान पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

0

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या टाक्यांच्या कामाला राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी टाक्या उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी 245 कोटी 24 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करत पहिल्या टप्प्यातील 82 टाक्यांचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले असून, कामाला सुरूवात झाली होती. मात्र 16 मार्चला राज्य सरकारने टाक्यांच्या कामाला स्थगिती दिल्याने काम ठप्प झाले होते.

टाक्यांच्या कामाला येणार वेग
डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल भोसले यांनी पाण्याच्या टाक्यांविषयी शंका उपस्थित केली होती. हे काम संबंधित कंपनीला देताना निविदा प्रक्रियेलाच हरताळ फासला गेला असून, ठराविक कंपनीलाच काम देण्यासाठी हे केल्याचा आरोप भोसले यांनी केला होता. तसेच, काही ठिकाणी भूसंपादन झाले नसतानाही निविदा काढल्याचाही आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी करून कामाला स्थगिती देण्याची विनंती भोसले यांनी लक्षवेधीद्वारे केली होती. काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ आणि शरद रणपिसे यांनीही याबाबत सभागृहात मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक जवळ आल्यामुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. मात्र, ही स्थगिती उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गोटातून मुख्यमंत्र्यांची मनधरणी सुरु होती. दुसरीकडे आयुक्त कुणाल कुमारही मंत्रालयात खास प्रयत्न करत होते. अखेर ही स्थगिती उठवल्याने टाक्या उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे.

कर्जरोख्यांवर निर्णय बाकी
या योजनेसाठी आवश्यक असलेली 2264 कोटी रुपयांची रक्कम कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारण्याच्या पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रस्तावाला निवडणुकीआधीच्या लोकप्रतिनिधींनी मान्यता दिलेली नाही. हे कर्जरोखे उभारण्यासाठी एसबीआय मर्चंट बँकेला सल्लागार नेमण्याची मान्यता देताना ही सर्व प्रक्रिया निवडणुकीनंतर नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच करण्याची अट त्यावेळीच्या मुख्य सभेने घालत प्रस्ताव मंजूर केला नाही. त्यामुळे महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजपच्या सत्ताधार्‍यांपुढे हा प्रस्ताव येऊन तो मंजूर होण्याच्या आत स्थगिती मिळाली होती. आता बहुमताच्या जोरावर सत्ताधारी हा प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता आहे.