‘समान पाणी’ योजनेच्या निविदेकडे कंपन्यांची पाठ!

0

पुणे । पुणेकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेकडून राबविण्यात येणार्‍या समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदेस आठवडाभराची मुदतवाढ देण्यात येणार आहे. या निविदांसाठी कंपन्या पुढे येत नसल्याने या योजनेचे काम करण्यासाठी दोन कंपन्यांना एकत्रीत निविदा (जॉईंट व्हेंचर) भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. यासाठीच्या निर्णयास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या निविदा भरण्यासाठी दोन आठवडे शिल्लक असतानाच हा बदल करण्यात आला असल्याने आता निविदा भरण्यास 5 जानेवारी 2017 पर्यंतची मुदतवाढ दिली जाणार आहे.

महापालिकेकडून शहरात समान पाणी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी काढण्यात आलेली पहिली निविदा वादग्रस्त ठरल्यानंतर प्रशासनाकडून मागील महिन्यात दुसरी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली आहे. त्या निविदा भरण्याची मुदत 28 डिसेंबरपर्यंत आहे. या कामाच्या अटी पाहता पुन्हा काही ठराविक कंपन्याच या कामासाठी पात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निविदा पुन्हा वादग्रस्त ठरण्याचे कारण पुढे करत प्रशासनाने या निविदा प्रक्रियेत स्पर्धा व्हावी, असे सांगत जॉईट व्हेंचरने निविदा भरण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार, या बदलाचे शुध्दीपत्रक काढले जाणार असून निविदा भरण्याची मुदत वाढविली जाणार असल्याचे महापालिकेतील प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

2 हजार 315 कोटींची कामे
या योजनेसाठी महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराने 2 हजार 625 कोटींचा आराखडा सादर केला होता. मात्र, महापालिकेच्या एस्टिमेट कमिटीने त्यात कपात करत तसेच अनावश्यक खर्चाला कात्री लावत सुमारे 2 हजार 315 कोटींच्या कामास मान्यता दिलेली आहे. ही योजना आता दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यांत शहरात 245 कोटी रुपयांच्या 83 पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. तर दुसर्‍या टप्प्यात संपूर्ण शहरात सुमारे 1 हजार 700 किलोमीटरची जलवाहीनी बसविली जाणार असून 3 लाख पाणी मीटर बसविले जाणार आहेत. या कामासाठीच्या या 5 निविदा आहेत.