समाविष्ट गावांमध्ये गुंठेवारीला मान्यता द्या

0

पुणे । पालिकेत समाविष्ठ 11 गावे आणि यापूर्वी 1997 मध्ये आलेल्या 23 गावांमधील निवासी तसेच व्यावसायिक मिळकतींची कामे गुंठेवारी कायद्यानुसार नियमीत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ही बांधकामे नियमीत न झाल्याने नागरिकांना तीन पट कर भरावा लागत असून या भागातील नागरिकांना गुंठेवारीने मान्यता मिळाल्यास या जाचक करातून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी ससाणे यांनी केली आहे. राज्यशासनाने महापालिकेत मागील महिन्यात नवीन 11 गावांचा समावेश केला आहे. त्या ठिकाणच्या अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांची माहिती पालिका प्रशासनाकडून संकलीत करण्यात येत आहे. त्यानंतर पालिकेकडून या भागातील घरांना मिळकतकर लावला जाईल. मात्र, जी बांधकामे अधिकृत नसतील त्यांना तीन पट कर आकारला जाईल. त्यामुळे या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच या गावांबरोबरच 1997 मध्ये आलेल्या 23 गावांमधील अनेक बांधकामांचीही गुंठेवारी झालेली नाही. त्यामुळे या मिळकतींनाही तीन पट भरावा लागत आहे. त्यामुळे यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी ससाणे यांनी केली आहे.