पुणे । महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांसाठी 100 ते 150 कोटींसह नगरसेवकांनी सुचविलेली यादीतील कामांसह रक्कम देण्यास नकार देण्यात आला आहे. त्याऐवजी या गावासाठी नवीन बजेटहेड सुरू करून अन्य कामातून वर्गीकरण करावे अशी उपसूचना देऊन स्थायी समितीने ही जबाबदारी प्रशासनावर ढकलली आहे.
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या विकासकामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूदच नाही. या गावांसाठी सुमारे 100 ते 150 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात प्रशासनाकडून अशा वेळी मोठ्या प्रकल्पांच्या अखर्चित निधीतून ही रक्कम वर्गीकरणाद्वारे दिली जाते.मात्र, पहिल्यादांच हा निधी 2017-18च्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या सह यादीतील कामांचा निधी या गावांसाठी वळविला जाणार होता. त्यासाठीचे अधिकार आयुक्तांना देण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. मात्र सह यादीतून या गावासाठी निधी देण्यास विरोध करण्यात आला. त्यावर या गावाच्या निधीसाठी बजेटहेड ओपन करुन अन्य कामातून वर्गीकरण करावे अशी उपसूचना मंजूर करण्यात आली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.