समाविष्ट ग्रामपंचायतींचा 15 कोटी निधी पालिकेकडे

0

पुणे । पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या अकरा गावांचा समावेश पुणे महापालिकेत झाल्यामुळे संबंधित ग्रमपंचायतींचा सुमारे 15 कोटी निधी महापालिकेला जमा होणार आहे. तसेच तेथील 592 कर्मचारी देखील महापालिकेच्या सेवेत समाविष्ट होणार आहेत. दरम्यान जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. बैठकीत महापालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांचा दप्तरांची देवाण-घेवाण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी दिली.

दप्तरांची देवाण-घेवाण
जिल्ह्यातील अकरा गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला आहे. त्या संबंधीचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. त्यानुसार केशवनगर, साडेसतरानळी, फुरसुंगी, आंबेगाव खुर्द, लोहगाव, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, शिवणे आदी गावांचा समावेश महापालिका हद्दीत झाला असून गावातील दप्तराची देवाण-घेवाण झाली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या 11 गावांच्या ग्रामपंचायतींचे एकूण 592 कर्मचारी महापालिकेत समाविष्ट होणार आहेत. परंतु अध्याप पालिकेत कर्मचार्‍यांच्या हस्तांतरणाचा कोणताही निर्णय झाला नाही असे देवकाते यांनी सांगितले.

11 गावांच्या खात्यात जमा
अकरा गावांमध्ये स्थानिक कर म्हणून जमा होणारा ग्रामनिधी, पाणीपट्टी, घरपट्टी तसेच 14व्या वित्त आयोगाचा निधीचा यात समावेश आहे. अकरा गावांमध्ये मिळून 15 कोटी 21 लाख 67 हजार 93 रुपयांचा निधीची रक्कम महापालिकेच्या 11 गावांच्या खात्यात जमा होणार आहे.
– संदीप कोहिनकर,
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी