समिती सक्षम असणे महत्वाचे

0

नंदुरबार । शिक्षणाच्या वारीत सादर करण्यात आलेल्या उपक्रमांचे शाळा स्तरावर आयोजन झाल्यास शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल. तसेच शाळेच्या विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती सक्षम असणे किती महत्वाचे असते, हेच आजच्या शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून दिसून येते, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ राहुल चौधरी यांनी केले. नंदुरबार येथे आयोजित तालुकास्तरीय शिक्षणाची वारीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अनुभवाचे आदान प्रदान
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सक्षमीकरणासाठी तसेच शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळास्तरांवर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी गुणवत्तावर्धक कार्यक्रमाचे तसेच व्यवस्थापन समितीने केलेल्या भरीव कामगिरीचे सादरीकरण शिक्षणाच्या वारीत मांडणी करून ते उपक्रम सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांना अनुभवाचे आदानप्रदान करण्यास मदत होणार आहे. यातून व्यवस्थापन समिती सक्षम होऊन शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणा ठरेल.

गुणवत्ता विकासासाठी योगदान आवश्यक
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कलमाडी वैशाली पाटील, गुलाब धनगर होळतर्फे रनाळे, लीलाबाई लुळे वावद यांनी शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी दिलेले योगदान किती महत्वाचे असते हे नमूद केले. तसेच नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा या विविध उपक्रम राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत दाखल होत आहेत. जिल्हा परिषद शाळा ह्याच विद्यार्थ्यांना मुलभूत व दर्जेदार शिक्षण देत आहेत, म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसाठी सदैव सक्रीय सहभाग देणे गरजेचे आहे, असे आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटन पंचायत समिती सभापती रंजना नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती ज्योती पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक अनिकेत पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. राहुल चौधरी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, डी.आय.इ.सी.पी.डी. नंदुरबारचे अधिव्याख्याता अनिल झोपे, शिवाजी औटी, पं. स. सदस्या उषा रमेश कोतवाल, सरपंच साहेबराव सावंत, ग्यानप्रकाश फौंडेशनच्या स्नेहल डी. के. व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते.

17 शैक्षणिक उपक्रमांचे प्रदर्शन
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे व डी.आय.इ.सी.पी.डी. नंदुरबारचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या सक्षमीकरणासाठी तालुकास्तरीय ‘शिक्षणाची वारी’ राजे शिवाजी विद्यालय, नंदुरबार येथील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आली. यात तालुक्यातील 14 केंद्र, न.प. शाळा तसेच शिक्षण विभागाचा 3 या प्रमाणे एकूण 17 शैक्षणिक उपक्रमाचे प्रदर्शन स्वरुपात सदरीकरण करण्यात आले.