कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडला शुक्रवारी न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला. मात्र, न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार समीरला त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागेल. तसेच जामीनकाळात त्याला निवासी पत्ता पोलिसांना कळवणे बंधनकारक असून, तो महाराष्ट्राबाहेरही जाऊ शकणार नाही. तसेच त्याला कोल्हापुरात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, दर रविवारी 11 ते 2 या वेळेत विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता
समीर गायकवाडला एसआयटीने 16 सप्टेंबर 2015 ला अटक केली होती. त्याच्या जामिनासाठी यापूर्वी चारवेळा सुनावणी झाली. शनिवारी सकाळी न्यायालयाने त्याचा निकाल दिला. गायकवाड याची 25 हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. परंतु, हे करताना न्यायालयाने त्याच्यावर काही निर्बंध घातले. त्यानुसार समीर गायकवाड याला दर रविवारी 11 ते 1 वाजता विशेष तपास पथकाच्या कोल्हापुरातील कार्यालयात हजेरीस यावे लागेल. साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालय त्याची गंभीर दखल घेईल. आपल्या वर्तनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. गेल्या दीड वर्षापासून समीर पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, आता जामीन मंजूर झाल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. गोव्यातील ‘सनातन संस्थे’चा साधक असलेल्या समीरला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर 2015 साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची सतत चौकशी सुरू होती. या काळात त्याने अनेकदा जामिनासाठी अर्जही केला होता.