समीर वर्मा कश्यपशी भिडणार

0

कॅलिफोर्निया । अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीतील उपांत्यपूर्व लढतीत पारुपली कश्यपसमोर भारताच्याच समीर वर्माचे आव्हान असणार आहे. तिसर्‍या फेरीत सहज विजय मिळवत या दोघांनी उपांत्यपूर्व फेरीतले स्थान निश्‍चित केेले. अन्य लढतीत भारताच्या एच.एस.प्रणॉयने विजयी आगेकूच कायम राखताना स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिसर्‍या फेरीत कश्यपने श्रीलंकेच्या निलुका करूणारत्नेचा 21-19, 21-10 असा पराभव केला. समीरने चीवट झुंजीनंतर ब्राझिलच्या यगोर सोएल्हाचे आव्हान 18-21, 21-14, 21-18 असे परतवून लावले. प्रणॉयचा तिसर्‍या फेरीत नेदरलँड्सच्या मार्क कालझॉव्हशी सामान झाला. मार्कला कश्यपने 18-21, 21-4, 16-21 असे हरवले. उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयची लढत आठवे मानांकन मिळालेल्या जपानच्या कांता सुनेयामाशी होईल.

अन्य भारतीय खेळाडूंमध्ये मनु अत्री आणि बी. सुमीत रेड्डी या जोडीने तिसरे मानांकन मिळालेल्या हेंद्रा तांदजेया आणि एंद्राऊ युनातो या इंडोनिशियन जोडीवर 21-16, 21-9 असा विजय मिळवला. दुहेरीच्या पुढील सामन्यात भारतीय जोडीचा सामना सातवे मानांकन मिळालेल्या हिरोकी ओकामुरा आणि मासायुकी ओनोडेरा या जपानच्या जोडीशी होईल. दुसरीकडे हर्षील दाणी, श्री कृष्णा कुदारावल्ली, रितुपर्णा दास या भारतीय खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.