अलिबाग। जागतिक बँकेच्या सहाकार्याने समुद्रकिनार्यांवर राबविण्यात येणारा राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत अडकला आहे. मदत व पुर्नवसन मंत्रालयाकडून या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पातंर्गत नऊ गावांमध्ये चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणी करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केले आहेत.
राज्याच्या पश्चिम समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा अथांग समुद्रकिनारा लाभला असून, या प्रकल्प उभारणीसाठी 550 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
सदरचा खर्च जागतिक बँकेमार्फत केला जाणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून हे काम महसूल विभागामार्फत पूर्ण केले जाणार आहे.तसेच, नगरपरिषद, महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश राहणार असल्याची माहिती समसोर येत आहे.
या प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे, उरण तालुक्यातील चाणजे, अलिबाग तालुक्यातील किहिम, गोंधळपाडा, मुरुड तालुक्यातील मुरुड, हाफिजखार, श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, खरसई आणि म्हसळा तालुक्यातील म्हसळा या नऊ गावांमध्ये चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील नऊ चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणीचे प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून सरकारदरबारी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी राज्याच्या मदत व पुर्नवसन विकास मंत्रालयाकडे सादर केले आहेत. मात्र, अद्याप या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. मंत्रालायची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध झाल्यावर निवारा केंद्र उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे.
निवारा केंद्रातील कामे
निवारा केंद्रासाठी समुद्र किनार्यापासून 500 मीटर ते 1.5 कि.मी. पर्यंत किमान 25 गुंठे जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. या जागेत 5050 मीटर निवारा केंद्राचे बांधकाम करण्यात येणार असून यामध्ये किमान 550 नागरिकांना सुरक्षित आसरा घेता येईल. या व्यतिरिक्त खारप्रतिबंध बंधारे बांधणे, जमीनी खालून विद्युत वाहिनी टाकणे आणि राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करणे ही कामे करण्यात येणार आहेत.
नागरिकांना मिळणार्या सुविधा
1 किनारपट्टी भागात चक्रीवादळ धडकल्यास चक्रीवादळ निवारा केंद्रात 550 नागरिकांना सुरक्षित आसरा घेता येईल.
2 याठिकाणी नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच, जखमींवर औषोधापचार करण्यात येतील.
3 निवारा केंद्रात आसरा घेतलेल्या नागरिकांना जेवणाची सोयही करण्यात येणार आहे. यावेळी वरिष्ठ अधिकार्यांचे मदतीवर लक्ष असणार आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातंर्गत नऊ ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणी केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठीचे प्रस्ताव मदत व पुर्नवसन विकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आलेले असून, या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर वेगात काम करण्यावर भर दिला जाईल.
सागर पाठक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी