हडपसर । शहरात बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये समुपदेशन होणे गरजेचे आहे. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे. याचबरोबर पोलिसांनी अशा घटनांमधील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शासन होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेनेच्या प्रवक्त्या, उपनेत्या डॉ. नीलम गोर्हे यांनी केले.
अल्पवयीन मुलीचा सांभाळ करणार्या महिलेनेच मुलीच्या गुप्तांगावर चटके दिल्याची घटना हडपसरमध्ये घडली. याबाबत शनिवारी डॉ. गोर्हे यांनी हडपसर येथे त्या मुलीची व तिचा सांभाळ करणार्या पालकांची भेट घेतली. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार व तपास अधिकारी यांच्याकडून या गुन्ह्याबाबत माहिती घेतली.
आरोपी महिलेची चौकशीची मागणी
संबंधित मुलीला बालसुधारगृहात दाखल करावे. आरोपी महिलेबाबत स्थानिक नागरिकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत. आरोपी महिलेची सखोल चौकशी करावी. हडपसर परिसरात यापूर्वी सरोगसी मदर प्रकरण, कौटुंबिक द्वेशातून लहान मुलाची हत्या तसेच लहान मुलांचे अपहरण अशा घटना घडलेल्या आहेत. परप्रांतातून पुणे शहरात अनेक लोंढे येतात. बहुतेक गुन्ह्यांमध्ये आरोपी गुन्हे करून परप्रांतात पलायन करतात. असे दिसून आले आहे. बाललैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबाला कायदेविषयक माहिती देण्यासाठी महिला दक्षता समिती मधील सदस्यांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन यावेळी डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. यावेळी नगरसेवक नाना भानगिरे, प्राची आल्हाट, स्त्री आधार केंद्राचे रमेश शेलार, मनिषा वाघमारे, योगीता शेलार, संगीता गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.