समूळ पोलिओ निर्मुलनाचे ध्येय

0

धुळे : धुळे जिल्ह्यात 29 जानेवारी व 2 एप्रिल 2017 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी सूक्ष्म पातळीवर नियोजन करीत ही मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी येथे दिले. पोलिओचे समूळ निर्मुलन करण्यासाठी आवश्यक ती मदत तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याची आपली जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समन्वय समितीची शनिवारी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती
जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. कमलाकर लष्करे, डॉ. अनिल भामरे, डॉ. अविनाश पाटील, डॉ. बाळासाहेब चव्हाण, उपशिक्षणाधिकारी पी. जे. शिंदे, डॉ. दिलीप लोमटे, डॉ. आनंद गिंदोडिया यावेळी उपस्थित होते. डॉ. लष्करे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पल्स पोलिओ लसीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली.

लसीकरणाचा डोस द्यावा
निवासी उपजिल्हाधिकारी हुलवळे यांनी सांगितले, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील एकही बालक या लसीकरणापासून वंचीत राहता कामा नये. या वयोगटातील प्रत्येक बालकास लसीकरणाचा डोस द्यावा. नर्सरी, पाळणाघर, बांधकामाचे ठिकाण, टॅक्सी व रिक्षा थांबे, बसथांबे, वीटभट्टीवरील मजुरांचे वरील वयोगटातील मुलांचेही लसीकरण झाले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकातील बालकांना हा डोस कसा मिळेल? याचेही नियोजन करावे. योग्य नियोजन करून पोलिओ निर्मुलनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

लसीकरणासाठी एकूण 1226 बूथ
जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1 लाख 72 हजार 990, तर शहरी भागात 15 हजार 755 लाभार्थी बालकांची संख्या आहे. एकूण 1226 बूथ असतील. त्यात तीन सदस्यीय बूथची संख्या 891, तर दोन सदस्यीय बूथची संख्या 335 आहे. 55 पथके रेल्वेस्थानक, बसस्थानक, तपासणी नाके, टोलनाक्यांवर थांबून बालकांचे लसीकरण करतील. याशिवाय 82 फिरते पथके असतील, अशी माहिती डॉ. मोरे यांनी यावेळी दिली. धुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात या मोहिमेसाठी चार भाग करण्यात आले आहेत. एकूण 180 बूथ असतील, तर लाभार्थी बालकांची संख्या 68 हजार 704 एवढी राहील, असे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. एकूण 682 एवढे मनुष्यबळाची आवश्यकता असून नियोजन पूर्ण झाले आहे. याशिवाय राष्ट्रीय छात्रसेना, स्काऊट- गाइडचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. शिरपूर व दोंडाईचा नगरपालिका क्षेत्रात लाभार्थी बालकांची संख्या 20 हजार 67 एवढी असून नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, असे डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले.