शहापूर (जितेंद्र भानुशाली)। नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नागपूरनंतर शनिवारी ठाणे जिल्ह्यात जमिनीची पहिली खरेदी करण्यात आली. शहापूर तालुक्यातील हिव गावातील दोन शेतकरी व वाशाळे येथील एक अशा तीन शेतकर्यांची एकूण चार एकर 35 गुंठे जमीन खरेदी करण्यात आली. तालुक्यातील शेतकरी 20 जुलै रोजी उत्स्फूर्त जेलभरो आंदोलन करणार आहेत. शिवसेनेच्या या ‘डबल ढोलकी’ भूमिकेने शेतकर्यांमध्ये कमालीच्या संतापाची भावना आहे.
इतकी घाई का?
एकनाथ शिंदे यांनी इतकी घाई करण्याची आवश्यकता काय होती, असा संतप्त सवाल शेतकर्यांनी आणि शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार, हरिभाऊ खाडे, बबन हरणे यांनी शहापुरात झालेल्या बैठकीत केला. या बैठकीस तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. एमएसआरडीसी व राज्य सरकारने जंग-जंग पछाडूनही शहापूर तालुक्यात एकही शेतकरी समृद्धी महामार्गासाठी जमीन द्यायला तयार नाही. तालुक्यात सरकारविरोधी कमालीच्या संतप्त भावनांमुळे शनिवारी शहापुरातील नियोजित खरेदीनाट्य ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उरकण्याची वेळ प्रशासनावर आली. हा संघर्ष चालू असतांनाच तालुक्यातील हिव आणि वाशाळा या गावाच्या तीन शेतकर्यांना फोडण्यात सरकारला यश आले. त्यांनी ’समृद्धी’साठी जमिनी लिहून दिल्याने आता वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकर्यांनी जेलभरो आंदोलनाचा पवित्रा जाहीर केल्याने शेतकरी व सरकार यांच्यातील हा संघर्ष आणखी शिगेला पोहचला आहे.