मुंबई (निलेश झालटे)। समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत 344 हेक्टर जमिनीचे खरेदीखत झाले आहे. समृद्धीसाठी काही शेतकर्यांचा विरोध असला तरी खरेदीखत शेतकर्यांच्या मर्जीने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या शेतकर्यांना जमिनीच्या मोबदल्यात सरकारी दरापेक्षा 5 पट अधिक रक्कम दिली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत 50 टक्के जमिनीचे खरेदीखत करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. शेतकर्यांचा विरोध पाहून हे उद्दिष्ट पूर्ण होईल का? हा खरा प्रश्न आहे. या 710 किलोमीटरच्या महामार्गासाठी 96 टक्के मोजणीचे काम आतापर्यंत झाले असल्याचेही विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
प्रत्यक्ष खरेदीचे टार्गेट मोठे
समृद्धी महामार्गासाठी जमिनीचे हस्तांतरण प्रक्रिया वेग घेत असून एकूण 9364 हेक्टर जमिनीचे टार्गेट शासनापुढे आहे. यातील 8531 हेक्टर जमीन खाजगी म्हणजे शेतकर्यांची असून वन व शासनाची 833 हेक्टर जमीन आहे. यातील आतापर्यंत 344 हेक्टर जमिनीचे खरेदीखत झाले आहे. यासाठी शेतकर्यांना जवळपास 244 कोटी रुपये दिले गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकूण जमिनीच्या 50 टक्के जमीनीचे पुढच्या ऑक्टोबर पर्यंत खरेदी झाली पाहिजे असे निर्देश दिले आहेत. मात्र त्या मानाने खरेदीखत करण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे.
96 टक्के मोजणी
समृद्धी महामार्गासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. मात्र या प्रकल्पाच्या मोजणीचे काम 96 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे. 4 टक्के काही शेतकर्यांच्या विरोधामुळे राहिली आहे. समृद्धीसाठी जमीन देण्यासाठी 2652 हेक्टरची लेखी स्वरूपात संमती मिळाली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यातील 344 हेक्टरचे खरेदीखत झाले आहे.
समृद्धी महामार्ग विकासातील महत्वाचा टप्पा आहे. जमीन खरीदेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. 2019 पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी काही ठिकाणी विरोध होत आहे मात्र 80 टक्के पेक्षा जास्त जमीन ही कोरडवाहू आहे.
– मदन येरावार राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)