समृद्धी महामार्गाला विरोध करणार्या उद्धव ठाकरे यांना चेकवाटप समारंभास पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. शहापुरातील शेतकर्यांनी जमीन देण्यास सुरुवातीपासून विरोध केला होता. शेतकर्यांच्या संघर्ष समितीने जमिनी घेणार्या एमएसआरडीसीचा आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधाचा ठराव केला? हे उद्धव ठाकरे यांना माहीत नव्हते का?
शेतकर्यांना पुतनामावशीचे प्रेम दाखवणार्या शिवसेनेचे खरे रंग यानिमित्ताने उघड झाले आहेत. ठाणे जिल्हा संघर्ष समितीने थेट सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचे व्यवहार दाखवून शेतकर्यांवर दबाव आणत आहे. मोजणीला संमती नसताना जबरदस्तीने मोजणी केली जात आहे. पोलिसांचे ताफे आणून दबाव निर्माण करत आहेत, असा आरोप या संघर्ष समितीने केला आहे. मी जे काही करतो ते उद्धव ठाकरे यांच्याच आदेशावरून करतो, असे सांगून सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉल उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या संमतीनेच हे सुरू झाले आहे. शेतकरी काही मूर्ख नाहीत. मात्र, महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची शिवसेनेला का घाई? याचे कोडे मात्र, शेतकर्यांना उलगडलेले नाही. विधीमंडळाच्या दिवाळी अधिवेशनात ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी जमीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांना लक्ष्य केले होते. या महामार्गात जाणार्या जमिनी परदेशी यांच्या नातेवाइकांनी खरेदी केल्याचा आरोप ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी विधानसभेत केला. त्या आरोपांचे काय झाले? या आरोपांनंतर सार्वजनिक उपक्रम मंत्री परदेशी यांना भेटले. परदेशींनी मंत्रीमहोदयांना काय आश्वासन दिले? हेसुद्धा समजायला हवे. ही भेट उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून झाली होती का? हेसुद्धा कळले तर शेतकर्यांचे तारणहार कोण? हे समजेल. सोमवारी पुन्हा उद्धव ठाकरे यांनी नव्याने आदेश दिले आहेत. शेतकर्यांना उद्ध्वस्त करून समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, अशी पुन्हा एकदा वल्गना केलीआहे. औरंगाबाद, नाशिक, सिन्नरच्या शेतकर्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी शेतकर्यांना खूश करण्यासाठी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शेतकर्यांना अगोदर नाशिक- सिन्नरच्या शेतकर्यांनी भेटावे. त्यांना काय अनुभव आला, याची माहिती घ्यावी. नंतरच उद्धव ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा, अन्यथा त्यांना कुणी वाली उरणार नाही.
सुभाष देसाईंची निवृत्ती
उद्योग मंत्री सुभाष देसाईंची पंचाहत्तरी नुकतीच वाजतगाजत साजरी झाली. 75 वर्षे झाल्यानंतर मंत्रिपदावरून खाली उतरून पक्षाचे काम करण्याची उपरती सुभाष देसाई यांना झाली आहे. गोरेगाव मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतले गेले. विधानसभेत निवडून आलेल्या एकनाथ शिंदेसारख्या समर्थ नेत्याला डावलून त्यांना उद्योग मंत्री करण्यात आले. उद्योग खाते सांभाळताना त्यांच्या पुत्राने केलेल्या भूषणावह कामगिरीमुळे एमआयडीसीतील मोठे अधिकारीही कंटाळले होते. निवडणूक आल्यानंतरच सुभाष देसाईंच्या गाडीची काच खाली उतरते अन्यथा नेते असल्याने त्यात उद्धव ठाकरे यांच्याजवळचे नेते असल्याने त्यांच्या गाडीची काचच खाली उतरत नाही, असे गोरेगावातील शिवसैनिकच सांगतात. समस्त शिवसैनिकांना अप्रिय असलेले नेते, अशी त्यांची ख्याती आहे. अशा सुभाष देसाईंना मंत्रिपदाची झूल खाली उतरवून पक्षसंघटनेनेच काम करण्याची इच्छा आहे. सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोन मंत्र्यांना आगामी अधिवेशनानंतर डच्चू देऊन नव्या चेहर्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सत्कार समारंभात सुभाष देसाई यांनी पक्षसंघटनेची धुरा सांभाळण्याची घोषणा केली असावी.
नितीन सावंत – 9892514124