16 पॅकेजपैकी 13 पॅकेजवर शिक्कामोर्तब, 16 वेगवेगळ्या कंपन्यांना दिले काम
डिसेंबरमध्ये भूमिपूजन होऊन कामाला होणार सुरुवात
निलेश झालटे,मुंबई-बहुप्रतिक्षित असा राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गातील अडथळे जवळपास संपले असून डिसेंबर महिन्यात भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या कामासाठी एकूण 16 पॅकेज तयार केले आहेत. 16 पॅकेजपैकी 13 वेगवेगळ्या कंपन्यांना प्रत्यक्ष कामाचे टेंडर दिले गेले असून उर्वरित 3 पॅकेजची टेंडर प्रक्रिया गुरुवार, 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 13 कंपन्यांना 27, 041 कोटी रुपयांचे टेंडर दिले गेले आहे. राज्यातील महत्वाचा आणि देशातील सर्वात लांब 710 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी 90 टक्के जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित 10 टक्के जमिनी नवीन भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत संपादित केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा
… तर नव्या कायद्यानुसार होणार संपादन
समृद्धी महामार्गासाठी जमिनीचे हस्तांतरण प्रक्रिया 90 टक्के पूर्ण झाली आहे. 9364 हेक्टर जमिनीचे टार्गेट शासनापुढे आहे. यातील 8531 हेक्टर जमीन खाजगी म्हणजे शेतकऱ्यांची असून वन व शासनाची 833 हेक्टर जमीन आहे. यातील 90 टक्के संपादन प्रक्रिया झाली असून 10 टक्के बाकी आहे. या जमिनीची संपादन प्रक्रिया नव्या भूसंपादन कायद्यानुसार केल्या जाणार आहेत. ‘लार’ ऍक्टनुसार या जमिनी देखील सरकारकडे घेतल्या गेल्या आहेत. आता विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन पर्याय असून एक तर मोबदला घेणे किंवा कोर्टात जाने हेच पर्याय त्यांच्याकडे आहेत.
खर्च वाढण्याची शक्यता
समृद्धी महामार्गासाठी 16 पॅकेज तयार केले आहेत. त्यातील 13 पॅकेजचे फायनल वर्क ऑर्डर निघाले आहेत. 3 पॅकेजचे टेंडर ओपनिंग गुरुवारी, 11 ऑक्टोबरला होणार आहे. या महामार्गाचे बांधकाम 16 वेगवेगळ्या कंपन्यां करणार आहेत. 13 कंपन्यांना 27041 कोटी रुपयांचे टेंडर दिले असून एकूण 16 कंपन्यांचे 35 हजार कोटी बांधकामाचा खर्च होईल असे सूत्रांनी सांगितले. या महामार्गासाठी जवळपास 46 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती, मात्र हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. हा खर्च वाढून 50 हजार कोटीच्या वर जाण्याची शक्यता आहे.