भुसावळ । राष्ट्रीय पातळीवरील शाळासिद्धी उपक्रमांतर्गत शाळांनी स्वयंमूल्यमापन केल्यानंतर शाळा ‘ए’ ग्रेडमध्ये आल्यास अशा शाळांचे विद्या प्राधिकरणातर्फे बाह्य मूल्यमापन करण्यात येवून शाळांना समृद्ध शाळा प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार असल्याचा निर्णय विभागीय निर्धारक निर्मिती कार्यशाळेत घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले बाह्य निर्धारक निर्मितीसाठी राज्यभरात आठ ठिकाणी विभागीय निर्धारक निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.
शाळासिद्धी उपक्रमांतर्गत नुकत्याच पार पडलेल्या विभागीय निर्धारक निर्मिती कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील 41 निर्धारक सहभागी झाले. त्यात आधी असलेल्या 10 राज्य निर्धारकांची संख्या धरल्यास एकूण 51 राज्य निर्धारक तयार झाल्याने निर्धारक निर्मितीत जळगाव जिल्हा अग्रभागी असल्याचे दिसून आले. तीनदिवसीय विभागीय कार्यशाळेतून राज्य निर्धारकांची निर्मिती करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
कार्यशाळा नियोजन प्रमुख जळगाव येथील राज्य निर्धारक तथा संपर्क अधिकारी अनिता परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नाशिक विभागीय प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे प्राचार्य डी.डी. सूर्यवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. यावेळी पुणे विद्या प्राधिकरण येथील निरीक्षक वाटेकर, अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण समन्वयक अनिल भांगरे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.नेहा शिरोरे, जेष्ठ अधिव्याख्याता रंजना लोहकरे, विषयतज्ञ गाढे, अहंकारे यांच्यासह कार्यशाळेतील तज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक अनिता परमार, भरत सूर्यवंशी, डॉ.जगदीश पाटील, सतीश जाधव, अनिल अहिरे, अर्चना जगताप, मनोहर चौधरी, विलास पाटील उपस्थित होते.
यांनी केले मार्गदर्शन
यावेळी प्राचार्य डी.डी. सूर्यवंशी व निरीक्षक वाटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले. तीनदिवशीय कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील तज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक अनिता परमार व डॉ.जगदीश पाटील तसेच भरत सूर्यवंशी नाशिक, सतीश जाधव नाशिक, अनिल अहिरे धुळे, अर्चना जगताप नंदूरबार, मनोहर चौधरी धुळे, विलास पाटील धुळे यांनी शाळासिद्धीतील विविध घटकांचे विश्लेषण करून प्रशिक्षणार्थी निर्धारकांकडून गटकार्य सादरीकरण करून घेतले. तसेच शंका निरसन केले.
89 जणांचा समावेश
कार्यशाळेत नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातून 24, जळगाव जिल्ह्यातून 41, धुळे जिल्ह्यातून 16 आणि नंदूरबार जिल्ह्यातून 8 असे एकूण 89 प्रशिक्षणार्थी निर्धारक आणि 8 तज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक सहभागी झाले होते. समारोपाच्या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी निर्धारकांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेतून शाळासिद्धी व बाह्य निर्धारक याविषयी सविस्तर माहिती मिळाल्याचे सांगितले. प्राचार्य डी.डी. सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रामकृष्णा पाटील व प्रविण ठाकरे यांनी केले.