भुसावळ। माणसाचे प्रश्न व्यावहारीक झाले आहेत. मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून तो टिकवून ठेवण्यासाठी वाचन, चिंतन, मनन करायला हवे. कविता हा साहित्यप्रकार माणसाला समृद्ध करण्याचा मार्ग आहे. दु:ख कविता गायनातून मांडलं तर ते हलके होते, असे मत चांदवडचे कवी, गीतकार विष्णू थोरे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळात जय गणेश फाउंडेशनने स्वर्गीय द्वारकाई नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होत. कोटेचा महिला महाविद्यालयात शुक्रवारी ‘कवितेचे गाव-शिव’ या विषयावर त्यांनी हे विचारपुष्प गुंफले. विचारमंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा होत्या. विचारमंचावर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस.पाटील, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्या उज्ज्वला मुंढे यांची उपस्थिती होती. सूत्रंसचालन संध्या राजूपत यांनी केले. प्रास्ताविक समन्वयक अरुण मांडाळकर यांनी केले.
कविता गायनाने रसिकांच्या अंतर्मनाचा घेतला ठाव
‘वेल जातो मांडवाला कळीचेही फुल होते, नांदताना नव्या घरी लेक नवी चूल होते’, ‘वेदनेच्या विहिरीचा बाई तळ लई खोल, दु:ख साकळून येते मुकी डोळ्यामधी ओल’ या स्वरचित कविता गायन करुन कवी थोरे यांनी रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला. ‘चौर्य’ चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेले ‘पायरीला गेले तडे पाय झाले जड, देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड’ हे गीत लयबद्ध सूरात सादर करून टाळ्या मिळवल्या. व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प भालोद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. जतीन मेढे हे गुंफतील. भुसावळ हायस्कूलमध्ये शनिवारी सकाळी 9 वाजता ‘अशी घडतात चरित्रे’ या विषयावर ते विचारांची मांडणी करतील, असे समन्वयक अरुण मांडाळकर, गणेश फेगडे यांनी सांगितले.
दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा
कवी थोरे यांनी रमजान मुल्ला यांची ‘मी कुणाची माझा कोण? सुख संगतीला, काळजातल्या ओसरीत धोंडा ठेवला’, भरत दौंडकरांची ‘बैलागत राबणारा बाप गाईगत होता, हात त्याचा खरबुडा पण आईगत होता’, प्रशांत मोरेंची ‘जिनं फाटतया तिथचं ओवावा धागा, गं बाई दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा’ आणि ‘ही वाट तुडवते तुझ्या घराचे दार’ या कविता लयबद्धपणे सादर केल्या. प्रत्येक कवितेला दर्दी रसिक असलेल्या विद्यार्थिनींनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.
कवितेचे सौंदर्य बदलतेय
कवितेत पूर्वी गावशिवाचं वर्णन ताकदीने मांडलेलं असायचं. मात्र, काळानुरूप कवितेचे स्वरुप बदलत आहे. ‘कस्तुरी पाना-पानाचा डोळ्यात गेला फुफाटा, तुझ्या गं येळेपणाचा गावात झाला बोभाटा’ अशा कविता नवोदित कवींच्या लेखणीतून प्रसवल्या आहेत. गावशिव ओलांडलं की कवितेचे सौंदर्य बदलत आहे. शेती-मातीपासून काहींची नाड तुटत चाललीय याचं अतिव दु:ख अंतर्मनाला होते. माय मातीच्या उपकाराची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी, असेही थोरे यांनी नमूद केले.
मनाचा ठाव घेतात कविता
कवितेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्वान कवींची समाजातील घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुर्वीच्या काळात कवितांच्या माध्यमातूनच जनजागृती करण्यात आली. त्यामुळे कविता या माणसाच्या मनामनात ठाव घेणार्या असल्याचेही कवि थोरे यांनी सांगितले.