समृध्दी महामार्गाचे 18 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

0

महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई मेट्रोचेही भूमिपूजन

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनचा मुहूर्त ठरला असून 18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. याच वेळी मुंबई मेट्रोच्या कामांचे भुमिपूजन देखील करण्यात येईल. फडणवीस सरकारचा चार वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन निवडणुकीचे वेध लागले तरीही सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता भूसंपादन अद्यापही पूर्ण झालेले नाही.

महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध होता. भूसंपादन लवकर मार्गी लागावे म्हणून सरकारने जमिनीचा भाव वाढवून दिला. महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य  रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे. या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे गौण खनिज मुरूम, दगड, माती सहज उपलब्ध व्हावी तसेच शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळावा, यासाठी ठेकेदार शेतकऱ्यांना मोफत शेततळे तयार करून देणार आणि यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य शासनाने यासाठी नुकतेच परिपत्रक काढले आहे. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम जवळपास 90 टक्के पुर्ण झाले आहे. आता राज्य शासन लवकरच समद्धी महामार्गाच्या कामाला सुरवात करणार आहे. त्यासाठी येत्या 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.