जळगाव – शहरातील जुन्या सम्राट कॉलनीत घरात स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलेंडरच्या नळीने पेट घेतल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. नागरीकांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
सम्राट कॉलनीतील प्लॉट क्रमांक 96 मध्ये बाजीराव पुनाजी महाजन हे कुटूंबियांसह राहतात. शनिवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या आई सुमनबाई या घरात स्वयंपाक करीत होत्या. यावेळी अचानक गॅस सिलेंडरच्या नळीने पेट घेतला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे सुमनबाई यांच्यासह त्यांची नात भीतीपोटी घराबाहेर पडल्या.
अर्धातासानंतर आगीवर नियंत्रण
आग लागताच घरातील महिला व परिसरातील नागरिकांनी गोधडी, चादर ओल्या करून सिलेंडरवर टाकल्या परंतु आग विझत नव्हती. काही जणांनी परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपावरुन फायर एक्टींग्यूशर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आग आटोक्यात आली. यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा एक बंद घटनास्थळी दाखल झाला होता. सुमारे अर्धा तासात आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवता आले. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
20 हजारांचे नुकसान
आगीमध्ये सुमारे 20 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती बाजीराव महाजन यांनी दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आगीमध्ये घरातील भांडे, वायर, कपडे जळून खाक झाले आहेत. दरम्यान, नवीन सम्राट कॉलनी या भागात विजतारा लोंबकळत्या असल्यामुळे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचण्यास बराच उशिर झाला. यामुळे परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला.