सय्यदनगर रस्ता : आमदारांकडून नागरिकांची दिशाभूल

0

हडपसर (अनिल मोरे)। सय्यदनगर येथील रेल्वे क्रॉसिंग गेट रस्ता विस्तारीकरणावर आमदार निधीतून 40 लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात रस्ता अजून लहान झाला असून शासनाच्या लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आमदार व मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली तर येत्या दोन दिवसांत आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. ससाणेनगर येथील सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूककोंडी नागरिक व वाहनचालकांची डोकेदुखी बनली आहे. येथे उड्डाणपूल करायचा की भुयारी यावरून राष्ट्रवादी आणि आणि भाजपमध्ये तणाव सुरू आहे. राजकीय भांडणात येथील प्रश्‍न भिजत पडला आहे.

त्यातच आमदार योगेश टिळेकर यांनी पुढाकार घेऊन गेट विस्तारीकरणासाठी 40 लाख रुपये निधीची तरतूद केली. संतप्त नागरिकांनी मंत्री आणि आमदार महोदयांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी आमदार टिळेकर यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी नगरसेवक मारुती तुपे, उज्ज्वला जंगले व राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे उपस्थित होते. रस्ता रुंद ना झाल्याने वाहतुकीचा प्रश्‍न मात्र कायम राहिला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या त्यामुळे जुगलबंदी यावेळी नागरिकांना पाहायला मिळाली.

नागरिकांच्या पैशांचा अपव्यय जाब विचारणार
सय्यदनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर आधी 35 फूट गेट रस्ता होता नंतर 40 लाख रुपये खर्च करून विस्तारीकरण केले आणि शासनाच्या पर्यायाने जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा भाजप आमदाराने केला आहे नागरिकांची दिशाभूल केली आहे. याचा जाब जनता रस्त्यावर उतरून विचारणार आहे भाजपची मनमानी व चमकोगिरी खपवून घेणार नाही आंदोलन केले जाईल.
– योगेश ससाणे, नगरसेवक

कोट्यवधींचा निधी आणला अन्
सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग रस्ता नियमानुसार 32 फूट केला असताना बालिशपणे आरोप करीत आहेत. दहा वर्षांच्या काळात कोट्यवधी निधी लाटला आणि कामे केली नाहीत. आमच्या काळात कामे होत असल्याने राष्ट्रवादीला झोंबत असल्याचा आरोप हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे. सय्यदनगरला जोडणार्‍या रेल्वे क्रॉसिंग गेटवर अरुंद रस्ता असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. येथील 28 फूट रस्ता अपूरा पडत असल्याने 32 फूट हा नियमानुसार केला आहे पण कार्यकर्ते आणून घोषणा दिल्या आणि निदर्शने केली असल्याची खोटी माहिती पसरविली जात आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे फक्त चांगल्या कामाला विरोध करीत आहेत….

15 वर्षांत आमदारांनी कामे केली नाहीत आम्ही पुढाकार घेऊन कामे करीत आहोत, त्याला खो घालण्याचे काम विरोधक करीत आहेत. राष्ट्रवादीने 2 कोटी रुपये खर्चून जलवाहिन्या टाकल्या कोट्यवधींचा निधी आणला आणि कामे मात्र केली नाहीत आणि आमच्यावर खोटे आरोप करीत आहेत.
– योगेश टिळेकर, आमदार