पुणे : ‘नागरिकत्व नोंदणी कायदा, सुधारणा कायदा आणि केंद्र सरकारचे विभाजन वादी धोरण ‘ विषयावरील गांधी भवन मैदानावर झालेल्या जाहीर सभेला गुरुवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. माजी केंद्रिय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. सप्तर्षी, डॉ. देवी, आशीष देशमुख , अन्वर राजन, अभय छाजेड, संदीप बर्वे व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘धर्मनिरपेक्ष राज्य या संविधानाच्या संकल्पनेविरुद्ध काम चालू आहे. धार्मिक आधारावर विभाजनाचा प्रयत्न सुरू आहे. सरकारी गुंड विद्यापीठात घुसून विद्यार्थी नेत्यांना मारतात. एकाचीही ओळख सरकारला पटलेली नाही, ही शरमेची बाब आहे.
यशवंत सिन्हा म्हणाले, ‘ आताच्या बिकट परिस्थितीत गांधीजींची आठवण प्रकर्षाने येत आहे. म्हणूनच गांधी शांती यात्रेचा पहिला मुक्काम पुण्यात घेण्यात आला. देशाच्या मूलभूत समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आनंद सत्ताधारी उपभोगत आहेत. नागरिकता देणे हा या कायद्याचा उद्देश नाही.३०२ खासदारांचे बहुमत आहे, म्हणून काय लाठी- गोळयांचे सरकार तुम्ही चालवाल का ? भाजपा ही देश तोडणाऱ्यांचा देशद्रोही पक्ष बनल्याने मी आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्ष सोडला. विरोध करणाऱ्यांना चिरडून टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. आपण रस्त्यावर उतरून त्यांना उत्तर दिले पाहिजे. पुण्याचे नागरिक क्रांतीकारक आहेत. त्यांनी दमनकारी सरकारला विरोध केला पाहिजे. बहुमत असले म्हणून सत्ताधाऱ्यांची मनमानी करता कामा नये. ३ हजार किलोमीटर ची ही यात्रा आम्ही निर्धार पूर्वक पूर्ण करु. बंधू भाव, सर्वसमावेशकतेचा आग्रह आम्ही धरणार आहोत. भाजपच्या राज्यात विरोध झाला तर ‘ देखना चाहता हुँ, जोर कितना बाजु ए कातिल में है ‘.३० जानेवारीला राजघाट वर येण्याचे आवाहन यशवंत सिन्हा यांनी जनसमुदायाला केले.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले,’ यशवंत सिन्हा जनतेच्या आवाजाला प्रतिसाद म्हणून मैदानात उतरले आहेत. लोक त्यांच्यासमवेत आहे. ही सत्याची लढाई आहे.एकता, अखंडतेची ही लढाई आहे. युवाशक्ती आमच्या समवेत आहे. ‘ वन मॅन शो, टू मॅन आर्मी ‘ ची अक्कल जाग्यावर आणली पाहिजे. त्यांची नौटंकी थांबवली पाहिजे.पंतप्रधांनांनी विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी देशाची दशा सुधारण्याचे काम करावे. संविधानाचा अपमान करू नये. देशाला गॅस चेंबर मध्ये ढकलू देणार नाही. ‘ सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही है ‘ या कवी दुष्यंतकुमार यांच्या कवितेच्या ओळीही त्यांनी ऐकवल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ देषात द्वेषाची विषारी शिकवण दिली जात आहे.कन्हैय्याकुमारची सभा पुण्यात होऊ देणार नाही, असे पुणे भाजपा म्हणत होती. पण, आज पुण्यातील युवाशक्ती जागृत झाली आहे. पुण्यातील शैक्षणिक संस्था,जनता पक्षाची , खोत, जानकर या सर्वांची माती संघ, भाजपाने केली.आठवले यांना आपली माती झाल्याचे अजून कळले नाही. अंधाराशी फारकत घेण्याचा निर्धार केला पाहिजे. अॅडॉल्फ हिटलरचा शेवट कसा झाला, हे सर्वांसमोर आहे. नागरिकत्वाचे कागद न दाखविण्याचे आंदोलन केले पाहिजे. गांधी विचार पेरणीची ही यात्रा आहे. वेळ, आणि निधी द्यावा असे आवाहन त्यांनी केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.