सरकारची आकड्यांची चालबाजी – शेतकरी संघटनांची सुकाणू समिती

0

मुंबई : शेतकरी कर्जमाफी प्रश्नी आकड्यांची चालबाजी करून सरकार शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. फसवणूक करणा-या घोषणा करून राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे. कर्जमाफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य लाभार्थींच्या जिल्हावार संख्या यादीतून सरकारची ही चालबाजी आता पुन्हा स्पष्ट झाली आहे. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समिती सरकारच्या या गलथान चालबाजीचा धिक्कार करत असल्याचे शेतकर्यांच्या सुकाणु समीतीने जाहीर केले.

शेतकरी कर्जमाफीमध्ये ४० लाख शेतक-यांचे उतारे कोरे होतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. सरकारची ही आकडेवारी व दावा दिशाभूल करणारा व फसवा असल्याची प्रतिक्रिया तेव्हा सुकाणू समितीने दिली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने आता कर्जमाफीसाठी ४० लाखांपैकी ३६,१०,२१६ संभाव्य लाभार्थींच्या जिल्हावार संख्यायादी जाहीर केली आहे. लाभार्थींच्या जिल्हावार संख्येमधील गोंधळ पाहता सुकाणू समितीचे आक्षेप खरे ठरले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने अत्यंत चुकीच्या व दिशाभूल करणा-या आकडेवारीच्या आधारे कर्जमाफीची घोषणा केली व राज्यातील जनतेची दिशाभूल केली हे ही स्पष्ट झाले आहे असा आरोपही सुकाणु समितीने केला.

संभाव्य कर्जमाफी लाभार्थी याद्यांमध्ये मोठा गोंधळ आहे. याद्यांमध्ये कर्जमाफीसाठी मुंबई शहरात ६९४ शेतकरी व मुंबई उपनगरात ११९ शेतकरी पात्र असल्याचे दाखविण्यात आले आहे. मुंबई सारख्या शहरांमध्ये पिक कर्ज घेतलेले व शेती करणारे शेतकरी आहेत व ते संकटग्रस्त आहेत असा अर्थ या याद्या पाहता निघतो आहे. वस्तुस्थितीची ही क्रूर चेष्टा आहे. जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार वर्धा जिल्ह्यात एकही संभाव्य लाभार्थी नसल्याचे दाखविण्यात आले आहे. देशभरातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ज्या विदर्भात होतात त्या विभागातील वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना एकही गरजू व संकटग्रस्त शेतकरी सापडला नसल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.

अहमदनगर व नाशिक जिल्हा बँकेची वसुली उत्तम असतानाही येथे लाखो शेतकरी थकीत दाखविण्यात आले आहेत. कर्जमाफीच्या शर्ती व अटींमुळे प्रत्यक्षात या जिल्ह्यातील गावांमध्ये बोटावर मोजता येतील इतकेच शेतकरी प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी पात्र होतील अशी परिस्थिती आहे. पालघर सारख्या जिल्ह्यात केवळ ९१८ शेतकरीच संकटग्रस्त असल्याचे याद्यांमध्ये दाखविण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ज्या याद्यांचा हवाला देऊन ४० लाख उतारे कोरे होणार असल्याचे जाहीर केले त्या याद्या जर इतक्या फसव्या असतील तर मुख्यमंत्र्यांची घोषणाही स्वाभाविकपणे तितकीच फसवी असणार हे उघड आहे. सुकाणू समिती आपल्या राज्यव्यापी जनजागरण दौऱ्यात सरकारचा हा दिशाभूल करणार चेहरा जनतेसमोर उघड करणार आहे.
डॉ. अजित नवले, राज्य समनव्यक, सुकाणू समिती