सरकारची धोरणे शेतकरी विरोधी

0

रघुनाथ पाटील : शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर

शेलपिंपळगाव । सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची टिका शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली. शेतकरी संघटनेतर्फे आयोजित शेतकरी प्रशिक्षण शिबिर संगमवाडी येथे नुकतेच संपन्न झाले. दोन दिवस चाललेल्या या शिबिराचे उद्घाटन रघुनाथ पाटील, कालिदास आपटे, शिवाजीराव नांदखिले, पांडुरंग रायते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शेतकर्‍यांनो, कर भरू नका!
यापुढे जोपर्यंत सरकार निर्यातमूल्य कमी करून शेतमालाला योग्य हमीभाव देत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांनी कुठलाही शासकीय कर भरू नये, असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी यावेळी केले. कृषी प्रधान देशात तीन लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. परंतु त्याकडे सरकारचे लक्ष नसल्याने शेतकर्‍यांना आंदोलने व मोर्चे काढावे लागत आहेत. सरसकट कर्जमाफीला पैसे नसणार्‍या सरकारकडे आमदार, खासदार, राष्ट्रपती यांचे वेतन वाढवायला पैसे आहेत. जातीपातीच्या लढाया झालेल्या या देशात शेतकर्‍यांनी शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून लढाई लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध विषयांवर मार्गदर्शन
प्रशिक्षण काळात विविध विषयांवर तज्ज्ञांकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन बाळासाहेब दौंडकर, सुभाष पवळे, वस्ताज दौंडकर या पदाधिकार्‍यांसह शेतकरी संघटनेतील सुनिल पोटवडे, परसराम खैरे, संदीप खैरे, दत्तात्रय खलाटे, भाऊसाहेब दौंडकर, पांडुरंग गायकवाड यांनी केले.