अजित पवार : कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा
बारामती । बारामती तालुक्यातील सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत यासाठी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. सध्याचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. सरकारची धोरणे सहकारी संस्थांच्या विरोधात आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या गैरव्यवहारातील रक्कम वसूल करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेशराव गोफणे, उपसभापती विठ्ठलराव खैरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मदन देवकाते, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, सचिव अरविंद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकर्यांना चांगली बाजारपेठ व सोयी सुविधा देणे हे बाजार समितीचे प्रमुख कर्तव्य आहे. शेतकर्यांनी पिक पद्धतीत बदल केल्यामुळे फळबागांमध्ये चांगली प्रगती केली आहे. पारंपारिक पिके गहू, ज्वारी, बाजरी याऐवजी ठिबक सिंचनचा वापर करून फळबागा व ऊस शेती शेतकर्यांनी विकसित केली आहे. याचबरोबर चारा उपलब्ध झाल्यामुळे दुग्ध व्यवसाय चांगलाच वाढला आहे. सहकारी संस्थांमध्ये काही गडबड केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा ईशाराही पवार यांनी यावेळी दिला.
राजकारण करू नका
निधी उपलब्ध झाल्यामुळे फलटण बारामती रस्ता यावर्षी पूर्ण होईल. पाटस-इंदापूर व्हाया बारामती हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला असून त्याचेही काम लवकरच सुरू होत आहे. या मार्गावरील जमीन बाधितांना रेडीरेकनर दराच्या चार पट भाव मिळणार आहे. त्यामुळे यात कोणीही राजकारण करू नये. बारामती-इंदापूर या रस्त्यावरील सर्व वळणे दूर होऊन हा रस्ता चार पदरी होणार आहे. त्यामुळे या भागाचा विकास नक्कीच होणार आहे.
एकजुटीने काम करण्याची गरज
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे बारामती नगरपालिकेने दुर्लक्ष करू नये. नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाने एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असा टोला नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांच्या साक्षीने पवार यांनी लगावला. बारामती बस स्थानकाबाबतीत प्रचंड तक्रारी आलेल्या असून याची पाहणी करणार आहे. यात कोणी दोषी आढळल्यास गय केली जाणार नाही. बस स्थानकासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, यापुढील काळात या बस स्थानकाच्या तक्रारी येता कामा नये. कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व्हरमध्ये सातत्याने बिघाड होताना दिसतो. त्यामुळे शेतकर्यांना हेलपाटे मारावे लागतात. शेतकर्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असेही पवार यांनी सांगितले.