सरकारची नजर आता बेनामी मालमत्तेवर!

0

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील लढाई आपण सुरुच ठेवणार असून, बेनामी मालमत्ता बाळगणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. वर्षाअखेच्या ‘मन की बात’मध्ये बोलताना मोदी यांनी डिजिटल पेमेंट करणार्‍यांना बक्षीसे, दिव्यांगांना सरकारी नोकरीत आरक्षण देवू, असे सांगतानात राजकीय पक्षांनी नोटाबंदीनंतर लागू झालेल्या नियमांतून सूट देणार नसल्याचे स्पष्ट केले. काळा पैसा आणि भ्रष्टाचार निर्मूलनाच्या सरकारच्या प्रयत्नांना कोणी खीळ घालू नये, यासाठी नोटाबंदीनंतर सरकारने वारंवार नियमांत बदले केले असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

कायदा सर्वांना सारखाच असेल!
काळा पैशाविरोधात पुढे येऊन सामान्य जनतेने साठेबाजांची ठोस माहिती सरकारला देऊन भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सरकारला साथ द्यावी, असे आवाहन करताना मोदी यांनी नमूद केले, की भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची ही केवळ सुरवात आहे. आम्हाला हे युद्ध जिंकायचे आहे. या लढाईतून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेतील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी गदारोळ करीत कामकाज होऊ दिले नाही. याबाबत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. मला या संसदेत नोटबंदी आणि राजकीय पक्षांना मिळणारा निधी यावर चांगली चर्चा करावयाची होती, असे मोदी यांनी स्पष्ट करीत या मुद्द्याबाबत सर्वसमावेशक चर्चा व्हायला हवी, असे मत व्यक्त केले. राजकीय पक्षांना सर्व प्रकारच्या सवलती मिळतात, अशा अफवा काही लोक पसरवित आहेत. मात्र ते लोक संपूर्णतः चुकीचे सांगत आहेत. कायदा सर्वांना सारखाच लागू केला जाईल. मग ते वैयक्तिक असो, संघटना असो वा राजकीय पक्ष असो, प्रत्येकाला कायदा पाळावाच लागेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

क्रीडापटूंचे कौतुक
कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी दोन योजना मोदी यांनी मन की बातमध्ये जाहीर केल्या. ग्राहक व व्यापारी यांना डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी 15,000 बक्षिसे दररोज देण्यात येतील, असे मोदी यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला 4-0 अशी जबरदस्त मात दिली. त्यामध्ये करुण नायर, लोकेश या युवा खेळाडूंचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. तसेच हॉकीच्या ज्युनिअर संघाने वर्ल्ड कप जिंकल्याने त्यांनाही शुभेच्छा दिल्या.