सध्या भाजपा सरकार ’एकला चलो रे’च्या धुनवर एककल्ली कामकाज चालवीत आहे. तर विरोधक ‘चर्चाच करायची नाही, बहिष्कार म्हणजे बहिष्कार’ या भूमिकेने सभागृहातच येत नसल्याने कामकाजात कुठलाही रस राहिला नसल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यातला त्यात शेतकरी कर्जमाफी आणि कालच्या शेतकरी मारहाण प्रकरणाने इथं अस्वस्थता वाढीस लागत असतानाच पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आपल्या वकिली शैलीत शेतकर्यांना गोंजारण्याचा प्रयत्न करत तीच ती ‘री’ ओढण्याचा प्रयत्न केला. विधानपरिषदेत मात्र विरोधी पक्षाने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अजून जिवंत राहिला असल्याची जाणीव ठेवत मिनिटभरदेखील कामकाज चालू दिले नाही.
कालच्या शेतकरी मारहाण प्रकरणी आज संतप्त भावना येत असताना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी निवेदन करत शेतकरी कर्जमाफीवर बोलून पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. हे बोलताना मुख्यमंत्री प्रचंड पोटतिडकीने सुसाट सुटले. बोलताना त्यांनी एकदम वैदर्भीय शैलीत, “कर्ज भरणार्यांना असं वाटू नये की सालं…” यातील ‘सालं’ हा शब्द येताच त्यांनी जीभ चावून सॉरी म्हणत शब्द मागे घेतला. मात्र आपण बोलताना मुख्यमंत्री आहोत हे ही कालांतराने विसरतात की काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला. विरोधी पक्षात आहोत या भावनेने सीएम बोलत होते. आणि असेही ते इतकं बोलतात की काय- काय म्हणून त्यांनी लक्षात ठेवावे. यावेळी त्यांनी पुन्हा शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा नेम असल्याची टीका केली. आणि पुन्हा सेनेबद्दल आस्थेने बोलत शिवसेनेला आपण सोबत असल्याची हमी दिली. त्यातल्या त्यात उद्धव साहेबांचे नाव घेतलं की ‘सैनिक’ शांतच. सेनेचे काही आमदार मात्र सभागृहातच सेनेच्याच मंत्र्यांना धारेवर धरत आपला भाजपप्रतिचा राग व्यक्त करताहेत. शिवसेना अद्याप जरी शेतकर्यांच्या बाजूने बोलत असली तरी धोरणात्मक चर्चा मात्र सत्तेत असूनही सेना करू शकत नाही हे सत्य आहे. आणि या भूमिकेच्या विरोधात स्वतः सेनेचे देखील काही सदस्य असल्याचे दिसत आहे. आज डॉक्टरांच्या संपाच्या बाबतीत सभागृहात बराच गोंधळ चालला. डॉक्टरांनी किती ताणून धरायचे? यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या संतापी भावना व्यक्त केल्या. सभागृहाला अस्त्र बनवत राज्यातील हजारो डॉक्टर्सला कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र खरोखर इतक्या डॉक्टर्सवर कारवाई केल्यावर राज्यात काय स्थिती होईल? याचा विचार सरकारने केला आहे काय? याचा विचार होणेही महत्वाचे आहे. डॉक्टरांचे हे ताणून धरणे जरा जास्त जरी झाले असले तरी डॉक्टरांप्रति सहानुभूती दाखविणार्या सरकारने त्यांच्यासाठी आता प्रभावी आणि धोरणात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
एकंदरीत सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुठलाही मेळ नाही. दोघेही ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन आहेत. आमदार निलंबनावरून विरोधक सभागृहात यायलाच तयार नाहीत. त्यामुळे चर्चा होणे दूरच. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील सभागृहाचे कामकाज सुरळीत घडवून आणत आहे. सगळ्या चर्चा अगदी सपाट चालत आहेत. गुळगुळीत चाललेल्या या चर्चेमध्ये कुठलाही विरोध नाही. आता उद्या तिसर्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. परिषदेत शेतकरी कर्जमाफीवरून कामकाज होणे शक्य नाही तर विधानसभेत पुन्हा विरोधकांशिवाय कामकाज सुरळीत होण्याची शक्यता आहे.
निलेश झालटे – 9822721292