सरकारचे ऑपरेशन ब्लॅक मनी पार्ट-2

0

नवी दिल्ली । काळे धन साठवणार्‍या उद्योजकांवर छापेमारी केल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आता देशातील भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांवर आपली वक्रदृष्टी वळवली आहे. मोदी सरकारच्या ऑपरेशन ब्लॅक मनी पार्ट-2 नुसार गुरुवारी देशातील 9 राज्यांमधील 18 आयएएस आणि आयएफएस अधिकार्‍यांच्या घरी छापे टाकण्यात आले. यात दिल्ली, गोवा, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, राजस्थान, तामीळनाडू, छत्तीसगड या राज्यांतील अधिकार्‍यांचा समावेश आहे. छापेमारी करण्यात आलेले सर्व अधिकारी वरिष्ठ असून महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. विशेष म्हणजे या अधिकार्‍यांची याआधीपासून खातेनिहाय चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाला मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्यांकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे. आयकर विभाग आणि आर्थिक गुन्ह्यांवर लक्ष ठेवणार्‍या तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारवर ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी अंमलबजावणी संचालनालयाने केंद्राच्या सूचनेनुसार 2 एप्रिल रोजी देशभरात छापे मारले होते. या छाप्यांमध्ये दोन हजार तीनशे बनावट कंपन्यांचा शोध घेण्यात आला होता. या सर्व कंपन्या काळे धन वापरत असल्याचे छापेमारीनंतर उघड झाले होते.

ऑपरेशन ब्लॅक मनी पार्ट-2 मोहिमेंतर्गत गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाची पथके कोलकाता, मुंबई, अहमदाबाद, पणजी, कोच्चि, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, लखनऊ, पाटणा, जयपूर, चंदिगड, जालंधर, श्रीनगर, इंदूर येथे पोहोचली होती.