नवी मुंबई । प्रतिनिधी गरीबांची कदर करीत नाहीत ते कायदे दुरुस्त करा, या सरकारच्या डोक्यात का भूगा भरला आहे का? असे सांगत अन्याय करणार्या शासकीय संस्था आणि सरकार यांची गाठ आता अन्यायाविरोधात लढणार्या नवी मुंबईकरांशी आहे, या नवी मुंबईकरांचे नेतृत्व मी करणार आहे, असा इशारा लोकनेते गणेश नाईक यांनी राज्य सरकारसह सिडको, एमआयडीसी आणि महापालिका या शासकीय संस्थांना दिला आहे.
बांधकामात गावकर्यांचा दोष नाही
निर्धार मोर्चा हा कुणाच्या विरोधात नाही तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. नवी मुंबईकरांचा आहे. हा मोर्चा अन्यायाच्या विरोधात आणि अत्याचार करणार्या प्रवृत्तींच्या विरोधात असल्याचे लोकनेते नाईक यांनी सुरुवातीच स्पष्ट केले. सिडकोने वेळेवर गावठाण विस्तार केला नाही त्यामुळे ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधकामे केली त्यामध्ये त्यांचा दोष नाही. मात्र बांधकामे नियमित करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याअनुषंगाने ठोस कायद्याच्या कसोटीवर टिकणारे धोरण सादर करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टिका त्यांनी केली. सरकारला जर ठोस धोरण तयार करता येत नसेल तर त्यांनी मला सांगावे, मी ठोस धोरण सुचवतो, असा सल्लाही त्यांनी दिला.
सरकारला जनतेच्या व्यथा समजून घ्यायच्या नाहीत
सिडकोच्या बसेसची हवा काढण्याचे आंदोलन केल्यानंतर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती सुरु झाली होती याची आठवण त्यांनी याप्रसंगी करुन दिली. परिक्षा काळातही नवी मुंबईतील झोपडयांवर, घरांवर तोडक कारवाई सुरु आहे. निदान नागरिकांचे दुःख समजून घेवून कोर्टाकडून परिक्षा काळासाठी सवलतीची मागणी सरकारने करायला हवी परंतु या सरकारला जनतेच्या व्यथा समजून घ्यायच्या नाहीत, असा आरोप लोकनेते नाईक यांनी केला. ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये एसआरए योजना आणतात मात्र नवी मुंबईत आणत नाही, हा दुजाभाव का? असा खडा सवाल त्यांनी केला. तुर्भे येथे शहराचा कचरा आणून टाकला जातो. शास्त्रीय पध्दतीने येथील डंम्पींग ग्राउंडचे व्यवस्थापन करु, असे पालिका प्रशासनाने सांगितले होते प्रत्यक्षात तसे झालेच नाही. उलट येथील दुर्गंधीमुळे तुर्भे परिसरात रोगराई वाढली. त्यामुळे स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांना रहिवाशांच्या बाजूने योग्य अशी भुमिका घेण्याची मुभा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिघा वासियांची घरे वाचत असतील पक्षांतर करण्याची परवानगी अपर्णा गवते आणि इतर नगरसेवकांना दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली. सरकार आणि सरकारी संस्थांची दादागिरी सुरु आहे. सिडको नोडमध्ये आता एन.ए.च्या नोटीसा धाडण्यात आल्या आहेत आणि लाखोंची बिले भरण्याचा तगदा लावला आहे. हॉकर्स पॉलिसी सरकारने मंजुर केली नाही आणि हातावर पोट भरणार्या शहरातील गरीब फेरिवाल्यांवर कारवाई सुरु आहे. फेरिवाल्यांनी रस्त्यावर बसावे असे आम्ही मुळीच म्हणत नाही मात्र त्यांच्यासाठी धोरण आणून सिडकोने हॉकर्स झोनसाठी भुखंड दिले पाहिजेत, अशी सुचना त्यांनी केली. सगळीकडे तोडाफोडा हे धोरण सरकारने अवलंबले आहे. माथाडींची घरे, अल्पउत्पन्न गटातील घरे, एपीएमसीमधील व्यापार्यांचे गाळे या सर्वांना नोटीसा धाडून कारवाई सुरु आहे. दंड आकारुन किंवा इतर उपाय करुन ही बांधकामे नियमित व्हायला हवीत. इतर शहरांमध्ये अनधिकृत बांधकामे नाहीत का? मग केवळ नवी मुंंबईतील बांधकामांवरच का कारवाई करता? असा प्रश्न त्यांनी विचारला. 2009 पर्यतच्या धर्मिक स्थळांना संरक्षण असतात 100 वर्षांपूर्वीची सर्वधर्मियांची धार्मिकस्थळे तोडण्यात येत असल्याबददल त्यांनी संताप व्यक्त केला. 2015 पर्यंतच्या विनापरवाना बांधकामांना संरक्षण देणार असल्याचे सरकारने जाहिर करुनही अशी बांधकामे तोडली जात असून सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. पावणे गावातील हरजिंदर सिंग मानकु या माजी वायुदल सैनिकाचे बांधकाम गुरुवारी पालिका आणि एमआयडीसीने कारवाई करुन पाडले. हे बांधकाम 1995 पूर्वीचे असताना ही हरजिंदर सिंग यांचे काही ही ऐकून न घेता त्यांच्यावर ही अन्यायकारक कारवाई केल्याचे अलिकडचे उदाहरण लोकनेते नाईक यांनी याप्रसंगी दिले. यापुढे सरकारचा सामना अन्यायाविरोधात लढणार्याशी असून त्यांचे नेतृत्व मी करणार असल्याचा इशारा लोकनेते नाईक यांनी दिला. 14 तारखेला आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर करण्यात येणार्या आंदोलनाता पाठींबा जाहिर करुन या आंदोलनात सहभागी होण्याची आवाहन लोकनेते नाईक यांनी भाषणात केले.
नवी मुंबईतील विविध घटकांवर सरकार आणि शासकीय संस्थांकडून सुरु असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी लोकनेते नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिडको, कोकणभवन, महापालिका आणि एमआयडीसी कार्यालांवर भव्य मोर्चा काढण्यात आला. 25 हजारांपेक्षा जास्त नागरिक नवी मुंबईतील कानाकोपर्यातून मोर्चामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील, माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, सभागृहनेते जयवंत सुतार काँग्रेसचे शहराध्यक्ष दशरथ भगत, पालिकेतील माजी विरोधीपक्षनेते रमाकांत म्हात्रे,पेट्रोलियम बोर्डाचे माजी अध्यक्ष चंदू राणे काँग्रेसचे बहुतांश नगरसेवक आदी उपस्थित होते. बेलापूर येथील क्रोमा शोरुम येथून या मार्चाची अत्यंत शिस्तबध्द आणि शांततेत सुरुवात होवून अर्बन हाट जवळ त्याचे सभेत रुपांतर झाले. राज्य शासन आणि शासकीय संस्थांचा घोषणा देवून निषेध करण्यात आला.