सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले दुध

0

अहमदनगर: शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकरी संपाच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या दिवशी पुणतांब्यात काही शेतकऱ्यांनी सरकारचे वर्ष श्राध्द घातले. सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जागतिक दूध दिवसाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पुणे-नाशिक महामार्गावर दुधाचा टँकर रिकामा करण्यात आला. संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी सरकारी धोरणाचा तीव्र निषेध केला.

दुध ओतले
सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्ष उलटल्यानंतरही पूर्तता न झाल्याने राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन, आणि किसान एकता मंचाने पुकारलेल्या संपामध्ये येवला तालुक्यातील धुळगाव आणि पाटोद्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध केला. संपाला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसेच्या वतीनं पुणे सातारा रस्त्यावरील खेड – शिवापूर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले.

कांद्यांच्या माळा घालून आंदोलन
गळ्यात कांद्याच्या माळा घालून कार्यकर्ते आपल्या बैलगाड्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शेतमाल तसेच दूध रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. तर प्रहार संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी गोतोंडीत दुध उत्पादक शेतकऱ्यांनी नागरिकांना दुधाचं मोफत वाटप केले.