सरकारच्या पारदर्शकतेच्या विधिमंडळात उडाल्या चिंधड्या

0

मुंबई | समृद्ध महामार्गाचे प्रमुख आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या मंत्रालयात एक-दोन कोटी दलाली देण्याची टेप बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वाजली. ‘व्हॉट्सअप’वर व्हायरल झालेल्या या टेपच्या आवाजाने सत्ताधारी या अधिवेशनात प्रथमच अडचणीत आले. सरकारच्या दलालीच्या टेपमुळे विरोधकांचा आवाज वाढल्याने सभाग्रहात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही संयम सुटला, तोल ढासळला, आवाज वाढला. टेपमधील आरोपांनी आक्रमक झालेल्या विरोधकांमुळे सरकारच्या पारदर्शक कारभाराच्या सभागृहात चिंधड्या उडाल्या आणि या वस्त्रहरणाने मुख्यमंत्र्यांना दरदरून घाम फुटला. शेवटी, या प्रकरणाची चौकशी करून “दोषी आढळल्यास कारवाई करू”, असे सांगून फडणवीस यांनी हे वस्त्रहरण तात्पुरते थांबविले.

मोपलवार यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. मोपलवारांच्या दलालीच्या ऑडिओ टेपवरून विरोधक आक्रमक झाले. यावर पारदर्शक सरकारचे म्होरके असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मोपलवार तुमचेच, ही टेप तुमच्याच सरकारच्या काळातली, असे म्हणत हे आरोप परतावून लावण्याचा प्रयत्न केला. दुपारपर्यंत दोन्ही बाजूंनी चांगलीच ‘टेपाटेपी’ आणि रेटारेटी सुरू होती.

समृद्धी महामार्गाच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीच्या ग्रुपवर कालपासून ऑडिओ क्लिप फिरत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून ‘सेटलमेंट’ सुरू असल्याचा दावा केला जातोय. या टेपचा आधार घेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले. या ऑडिओ टेपमुळे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मोपलवारांची चौकशी का केली नाही? त्यांना का बोलवले का नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. चौकशी होईपर्यंत, वादग्रस्त पार्श्वभूमीच्या मोपलवार यांना पदावरून बाजूला हटवावे, अशी मागणी विखे पाटील व अजित पवार यांनी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झाले.

टेप वाजली, पोल खुलली देवेंद्रबाबू कामुन बा चिडले?
टेपच्या पोलखोलमुळे मुख्यमंत्री चांगलेच चिडले होते. मोपलवार यांना सर्व महत्वाची पदे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मिळाली होती. मग त्यावेळी बाबा (पृथ्वीराज चव्हाण) तुम्ही झोपला होतात का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मुळात मोपलवार हे वादग्रस्त अधिकारी, त्यातच समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीची किनार यामुळे हे प्रकरण अन त्यातून विरोधक व पर्यायाने मुख्यमंत्रीही इरेस पेटले होते. समृद्ध महामार्गाचा एकून सारा कारभारच वादाचा आणि लफड्याचा आहे. ‘समृद्धी’लगत ठाणे व नाशिक जिल्ह्यातील व इतरही बऱ्याचशा जमिनी राज्याच्या माजी मुख्य सचिवाच्या मुलाने घेतल्याहेत, असा आरोप निरंतर होतोय. या सचिवाचा जावई सहाव्या मजल्यावर बसलाय, असे म्हटले जाते. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनीही नागपूरच्या अधिवेशनात समृद्धी महामार्गालगतच्या जमिनी कुणाच्या? असा सवाल केला होता. त्यावेळी एका शिवसेना आमदाराने विधानसभेत मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याचे थेट नावही घेतले होते. त्यानंतर मात्र ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेनेचे नेते ‘समृद्धी’बाबत एकाएकी आश्चर्यकारकरित्या शांत झाले होते.

मोपलावारांची त त प प
सरकारी दलालीच्या आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या मोपलवार यांची माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना चांगलीच भंबेरी उडाली. त त प प करतच त्यांनी सारवासारवी केली. माझ्या आवाजाची कुणीतरी व्हॉटस अपवर नक्कल केलीय. माझा आवाज काढून कुणीतरी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचलेय. माझे चौकशीला संपूर्ण सहकार्य राहील. या कटामागील सत्य चौकशीतून बाहेर येईलच, असे मोपलवार यांनी चाचरत चाचरतच सांगितले.