‘सोशल मीडिया महामित्र’ची माहिती अनुलोम संस्थेला जातोय
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेत आरोप
मुंबई:- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या मार्फत एकत्रित केलेला डेटा खाजगी संस्थेकडे जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला. प्वाईंट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत बोलताना चव्हाण म्हणाले की, सरकारच्या वतीने सोशल मीडिया महामित्र अप्लिकेशन लॉन्च केले आहे. राज्यभरातून या अंतर्गत ३०० महामित्र तयार केले गेले. ३ दिवसापूर्वी संभारंभात ३०० लोकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला गेला. लोकांची मने आणि मते घडविण्यासाठी या महामित्रांची मदत होणार असल्याचे सांगितले. मात्र हा गोळा केलेला डेटा खाजगी ट्रस्ट कडे जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
हे देखील वाचा
चव्हाण यांनी सांगितले की, अनुलोम या संस्थेला हि माहिती जाते. अनुलोम नावाचे ऍप तयार केलेले आहे. अतुल वझे यांनी ही संस्था मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सुरु केली असल्याचे सांगत सरकारची हि माहिती सरकारकडे राहत नाही तर खाजगी संस्थेकडे जाते असा आरोप केला. संमतीविना माहिती गोळा केली जात असल्याचा आरोप करत ही माहिती कुठे जाते, संस्थेसोबत असा काही करार केलाय का? असा सवालही त्यांनी केला.
सोशल मीडिया महामित्रांची निवड करताना सरकारी यंत्रणा वापरली आणि माहिती खाजगी संस्थेला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा मने वळवायचा प्रकार आहे. सगळी माहिती गोळा केली जात असून हे राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन असल्याचे सांगत याची चौकशी झाली पाहिजे आणि सरकारने माहितीआम्हाला द्यावी अशी मागणीही केली. यावर अध्यक्षांनी सरकारला याबाबत माहिती घेण्याचे आदेश दिले.