सरकारने घेतलेले जीएसटीसारखे निर्णय हे उद्योजकांना पूरक असतील : आमदार मेधा कुलकर्णी

0

पुणे । उद्योजक हे स्वत: उपजीविकेचे स्रोत निर्माण करतात आणि इतरांना देखील यामध्ये सामावून घेतात. उद्योजकांना चांगले दिवस असतील तर देशाचेही चांगले दिवस असतील. सरकारने घेतलेले निर्णय योग्य आहेत. आज थोडा त्रास असला तरीदेखील भविष्यकाळात या गोष्टीचा फायदा होईल. सरकारने घेतलेले निर्णय उद्योजकांना पूरक असतील. असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पराग गोरे लिखित ‘आय अ‍ॅम अ‍ॅन आंत्रप्रिन्युअर’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, लेखक पराग गोरे, श्रीकृष्ण चितळे, जयंत अभ्यंकर, अविनाश तरवडे, सुप्रिया लिमये, सुहास फडणीस, अभिजीत केळकर उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कार्य करणार्‍या डॉ. जितेंद्र जोशी, अंकुर चक्रवर्ती, महेंद्र कोलते, विजय कोटगोंड, नितीन मोरे व स्टिव्हन क्रिस्ती, नितीन कदम या उद्योजकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ई-बुकचे देखील प्रकाशन करण्यात आले.

उद्योजक कोणत्याही राष्ट्राचा पाया
आ. कुलकर्णी म्हणाल्या, उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे काम आहे. कारण उद्योजक हा कोणत्याही राष्ट्राचा पाया असतो. व्यावसायिकांना तसेच नवउद्योजकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी सरकारने देखील ‘मेक इन इंडिया’सारख्या योजना सुरू केल्या आहेत. सध्या अनेक व्यावसायिकांना जीएसटीमुळे त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हणत आहेत. परंतु सरकारने घेतलेले निर्णय योग्य आहेत. आज थोडा त्रास असला तरीदेखील भविष्यकाळात या गोष्टीचा फायदा होईल. सरकारने घेतलेले निर्णय उद्योजकांना पूरक असतील.

स्वत:मध्ये बदल घडविणे आवश्यक
संदीप कुलकर्णी म्हणाले, प्रत्येकाने आपल्याला जे मनापासून करावे असे वाटते असे काम केले पाहिजे. व्यवसाय करावा असे मनापासून वाटत असेल तर तो करावा. जेव्हा मनापासून व्यवसाय करण्याची इच्छा असते तेव्हा कोणतीही आव्हाने स्वीकारायला आपण तयार होतो. व्यवसाय करण्यासाठी काळानुसार काही गोष्टींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. बदल घडविण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. तुमची प्रगती झाली तर तुमच्या व्यवसायाची देखील प्रगती होईल.

सतत बदलत जाणारे क्षेत्र माहिती असावे
गोडबोले म्हणाले, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीची जाणीव असायला हवी. सध्याचे सतत बदलत जाणारे क्षेत्र उद्योजकांना माहिती असायला हवे. अनेकदा व्यवसायात अनेक अडचणी येतात. परंतु अडचणींवर मात करून आपला व्यवसाय वाढविला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा गोरे यांनी केले.