सरकारने फसवल्राचा गुन्हा नोंदवा

0

नागपूर । भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, अशी थेट टीका त्यांनी केली आहे. ऐतिहासिक कर्जमाफीची रक्कम खात्यात केव्हा जमा होते. याची शेतकरी वाट बघतोय. राज्यातील कोणत्याही तलावात बारमाही पाणी राहात नाही. तरीही वर्षभराची लीज वसूल करून मच्छिमारांची फसवणूक सुरू आहे. शेतकरी व मच्छिमारांची फसवणूक करणार्‍या राज्य सरकारच्या विरोधात 420 कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकरी व मच्छिमारांच्या बाजुने निर्णय झाला नाही, तर रस्त्यावर लढाई करू असा इशारा खासदार नाना पटोले यांनी दिला. खासदार पटोले यांनी फडणवीस सरकारला मुद्देसुदपणे कोंडीत पकडल्याने भाजपमधील नाराजांच्या गटांचे नेतृत्व त्यांच्याकडे येवू शकते. याची काही मंत्र्यांना चिंता आहे.

राजकारण हा आमचा धंदा नाही
30जून 2017 रोजी राज्य सरकारने काढलेला जीआर मच्छिमारांना वेठबिगार बनविणारा आहे. सामान्य माणसाची व्यथा मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. हे सरकारचे पाप असल्याचे त्यांनी मान्य केले. यावर त्यांनी दोन सदस्यीय समिती गठीत करण्याची घोषणा त्यांनी केली. राज्यात 25 कोटी वीज ग्राहक आहेत. दररोज वीज शुल्कात वाढ सुरू आहे. एक-दोन रुपये वाढ असली तरी ही रक्कम मोठी होते. एकीकडे रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. दुसरीकडे मच्छिमारांना बेरोजगार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलावाला बारमाही पाणी असेल तरच लीज देऊ अन्यथा मच्छिमार लीज देणार नाही. अशी भूमिका पटोले यांनी मांडली. राजकारण हा आमचा धंदा नाही. पण शेतकर्‍यांच्या पोटाची काळजी आहे. शेतकरी सरकारला भीक मागत नाही. आपला हक्क मागत आहे.

मासेमार -शेतकरी संघर्ष अभियान
कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर न लावता मासेमार -शेतकरी संघर्ष अभियान राबविण्याची घोषणा पटोले यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमिवर बजाजनगर येथे मच्छिमारांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, मच्छिमार संघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक बर्वे, विदर्भ मच्छिमार संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, प्रफुल्ल पाटील, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, मनू दत्ता, देविदास चवरे, रामदास पडवळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार पटोले यांच्या या भूमिकेाच परिणाम कोकणातही होवू शकतो. कोकणातील मासेमार पुन्हा संघर्ष उभारु शकतात.

मच्छिमारांचा विश्‍वासघात
गोसेखूर्द प्रकल्पातील मासेमारीचे कंत्राट स्थानिक मच्छिमारांना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु गोसेखूर्द मच्छिमार संघावर नागपूरच्या एका नेत्याने कब्जा मिळविला आहे. मच्छिमाराऐवजी राजकीय नेते आता मच्छिमार संघ चालवायला निघाले आहे. हा मच्छिमारांचा विश्‍वासघात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. विदर्भातील गडकरी व फडवीस समर्थकांना पटोले यांच्या भूमिकेची चिंता वाढली आहे. गडकरी यांनी जुडवून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी चर्चा आहे.