नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान सिक्कीम सीमेवरून प्रचंड तणाव निर्माण झाला असताना व याप्रश्नी चीनशी कूटनीतिक पातळीवर चर्चा सुरु असताना, काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आउट ऑफ वे (मर्यादेपलिकडे) जाऊन चीनचे राजदूत लू झाओहुई यांची गोपनीय भेट घेऊन चर्चा केली. या भेटीचे वृत्त चीन दुतावासानेच त्यांच्या संकेतस्थळावर टाकले व नंतर हटवले. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांनी उघड केल्यानंतर काँग्रेसने या भेटीचे वृत्त प्रथम फेटाळले परंतु, नंतर अशी भेट झाल्याची माहिती खरी असल्याचे सांगून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे विविध देशांच्या राजदूतांशी संपर्क साधत असतात, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या भेटीवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस विरोधकांनी मात्र खा. गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविली. कूटनीतीच्या पातळीवर सीमावादप्रकरणी चर्चा सुरु असताना, अशा प्रकारे चीनशी चर्चा करण्याची काहीच गरज नाही, या शब्दांत भाजप प्रवक्त्यांनी खा. गांधी यांच्यावर टीका केली.
चीनशी काय चर्चा केली?
सिक्कीम भागात भारत व भूतानला जोडणार्या भागात चीन हा रस्तानिर्माण करण्याचे काम करत आहे. भारत आणि भूतान दोन्ही देश या कामाला विरोध करत आहे. जवळपास महिनाभरापासून या भागात चीन व भारताचे सैनिक आमने-सामने उभे ठाकलेले असून, प्रचंड तणाव आहे. भारतीय सैन्याने या भागात अल्पकालिन सैन्य तैनात केले असून, त्यामुळे चीनचे पित्त खवळलेले आहे. भारत सरकार हा प्रश्न कूटनीतिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, 8 जुलैरोजी राहुल गांधी यांनी चीनचे राजदूत लू झाओलुई यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. त्या वृत्तावरून काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडली व त्यांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे मीडियाला सांगितले. नंतर मात्र भेटीचे वृत्त स्वीकारले. तर सत्ताधारी भाजपने काँग्रेसला चांगलेच आडव्या हाताने घेतले. भाजपचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहराव यांनी सांगितले, की सरकार राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असताना, राहुल गांधींना आउट ऑफ वे जाण्याची काहीच गरज नाही. आता त्यांनीच खुलासा करावा, अशी बैठक झाली का? अन् झाली असेल तर त्यांची चीनशी काय चर्चा झाली आहे?
काय म्हणते काँग्रेस?
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवरच टीकेची झोड उठवत, तीन केंद्रीय मंत्री चीनला गेले होते. ते कशासाठी चीनला गेलेत? याचा खुलासा पहिल्यांदा भाजप सरकारने करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जी-20 राष्ट्रांच्या बैठकीत चीनच्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांची वारेमाप स्तुती केली. ही बातमी तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व आयबीनेच प्रसारमाध्यमांत पेरली होती. खा. राहुल गांधी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याचे वृत्त प्रथम नाकारणारे सुरजेवाला यांनी मात्र नंतरच्या विधानांत राहुल गांधी व चीनी राजदूत यांच्यात बैठक झाल्याची कबुली दिली. ते म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष वेळोवेळी अनेक राजदूतांशी भेटत व चर्चा करत असतात. त्यात वावगे काहीच नाही. राहुल गांधी यांनी केवळ चीनशीच नाही तर भूतान राजदूतांशीही भेट घेऊन चर्चा केली आहे. या शिवाय, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.