सरकारने रेडीरेकनर दरांमध्ये कृत्रिम वाढ करू नये – क्रेडाई

0
पुणे : बांधकाम व्यवसाय विविध कारणांमुळे गंभीर अडचणींना सामोरे जात असल्याने महराष्ट्र सरकारने यंदा रेडी रेकनरचे दर वाढवू नयेत. उलट काही ठिकाणी ते कमी केले पाहिजेत. रेडी रेकनरचे दर कायम ठेवल्यामुळे महसुलात तोटा येणार नाही, असे क्रेडाई महाराष्ट्र म्हटले आहे.
या संदर्भात संघटनेच्या वतीने धोरण निर्माते व विधिमंडळ सदस्यांपुढे सादरीकरण करण्यात आले. क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी संघटनेच्या वतीने या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
 “राज्य सरकारसहित सर्वांना माहीत आहे, की बांधकाम उद्योग सध्या विविध कारणांमुळे कठीण काळातून जात आहे. यात रेरा, जीएसटीचा चढा दर, आर्थिक सुधारणा, गैरबॅंकिंग वित्तीय कंपन्यांच्या अडचणी, बाजारातील मागणी व पुरवठा यातील फरक इत्यादी कारणांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा रेडीरेकनरमध्ये वाढ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकार कृत्रिमपणे वाढ करू शकत नाही. खरे तर क्रेडाईने सध्याचा एएसआर दर (ॲन्युअल शेड्यूल ऑफ रेट्स) कायम ठेवण्याचीच नव्हे, तर गेल्या वर्षी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीद्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करून त्यात योग्य ठिकाणी कपात करण्याचीही मागणी केली आहे,”असे या निवेदनात म्हटले आहे.