एल्गार परिषदेवर कारवाईवेळी संघाची व्यक्ती सोबत!
भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांचा यांचा आरोप
मुंबई :- शहरातील कामगार चळवळ मोडित काढण्यासाठी सरकारने शहरी नक्षलवाद ही नवी संकल्पना आणली आहे. सर्व कामगार संघटनांनी याबाबत सावध राहावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुण्यातील एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पुणे पोलिसांनी धाडसत्र सुरू केले होते. कोरेगाव-भीमा दंगलीचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची अटक टाळण्यासाठी पोलिसांनी धाडसत्राची कारवाई केली आहे. कारवाई करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कृष्णा नामक व्यक्ती पोलिसांच्या सोबत होती. त्यामुळे ही कारवाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकेतानुसार होते आहे की काय, अशी शंका देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
आमच्याकडे असलेले भिडे यांच्या विरोधातील पुरावे नष्ट करण्यासाठी ही कारवाई केली आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पुणे पोलिसांनी धाडसत्र सुरू केले होते. या अंतर्गत पुणे, मुंबई आणि नागपुरातही धाड टाकण्यात आली. नागपुरातील ज्येष्ठ वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या बुद्धनगर येथील घरावर मंगळवारी पहाटे पुणे पोलिसांनी धाड टाकली. मात्र, ही कारवाई केंद्रीय पातळीवर आहे. यात राज्य सरकारचा हस्तक्षेप नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर आरोप केले आहेत. शिवाय, पोलिसांनी लॅपटॉप आणि इतर गोष्टी ज्या जप्त केल्या आहेत त्या गोष्टी न्यायालयात सादर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. शहरातील कामगार चळवळ मोडित काढण्यासाठी सरकारने शहरी नक्षलवाद ही नवी संकल्पना आणली आहे. सर्व कामगार संघटनांनी याबाबत सावध राहावे. मालकांच्या संगनमताने सरकार मोहिम राबवत आहे, अशी माहिती देत आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी सरकारने संभाजी भिडे यांना अटक न केल्यास विधीमंडळाला घेराव घालू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
एल्गार परिषदेवरील कारवाई केंद्र सरकारकडून – मुख्यमंत्री
एल्गार परिषदेत जमावाला भडकावल्याच्या आरोपावरून मुंबई, पुणे आणि नागपुरातील कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यकर्त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर पोलिसांनी छापे मारले आहेत. मात्र, हे धाडसत्र एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत नाही. तर, केंद्रीय पातळीवर ही कारवाई सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्यात सुरू असलेल्या धाडसत्राबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केंद्रीय पातळीवरुन होत असल्याचे म्हटले. भिडे यांच्या विरोधात काहीच पुरावे नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.