पुणे । सध्याच्या सरकारने गरीब, सर्वसामान्यांची निराशा केली असून, गुजरातमध्ये बदलाचे वारे वाहत असून राहुल गांधींना लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधानसुद्धा पाच-सहा वेळा गुजरात दौरा करत आहेत. इंदिरा गांधी पराभूत झाल्यानंतर मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. तशीच इतिहासाची पुनरावृत्ती 2019ला होणार असून येणार्या लोकसभेत काँग्रेसचे सर्वाधिक खासदार असतील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे जिल्ह्यात रथ यात्रेचा सांगता समारंभ शुक्रवारी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पार पडला. यावेळी खा. आनंद शर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला महाराष्ट्र प्रदेश काँग्रसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्रेवजीत कदम, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, कमल व्यवहारे, आ. शरद रणपिसे, उल्हास पवार, तसेच काँगेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप विरोधात ‘चले जाव’
चव्हाण म्हणाले, नोटाबंदी, जीएसटीमुळे देशातील 40 टक्के व्यापार घटला, व्यापारीवर्ग ‘एकहीभूल कमल का फूल’ असे म्हणत आहे. आज देशाची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात आहे. त्यामुळे ब्रिटिशांविरोधात ‘1942ला चलेजाव’चा नारा दिला होता, तसा भाजप विरोधात ‘चले जाव’चा नारा आज दिला पाहिजे. चव्हाण म्हणाले, देशाची, राज्याची सूत्रे काँग्रेसकडे गेल्याशिवाय गरीब, सर्वसामान्यांचे कल्याण होणार नाही. राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतर ही राज्यात शेतकरी आात्महत्या होत आहेत. कर्जमाफीचे पैसे मग कुणाला मिळाले. भ्रष्टाचार, दहशतववाद, काळा पैसा विरोधात नोटाबंदी केली. मात्र यातील काहीच साध्य झाले नाही. 90 टक्के नोटा रिझर्व बँकेकडे जमा झाल्या मग काळा पैसा कुठे गेला.
‘ये तो सिर्फ झांकी है दिल्ली महाराष्ट्र बाकी है।’
यावेळी शर्मा म्हणाले, भाजपचे माजी पंतप्रधानसुद्धा इंदिरा गांधींना ‘दुर्गा अवतार’ म्हणाले होते, इतके मोठे काम त्यांनी देशासठी केले. आज भाजप म्हणत आहे काँग्रेसने काय केले, पण इंदिरानी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तानला शरण आणले, भाजप इतिहासाची मोडतोड करत आहे. ध्रुवीकरण करत आहे. परंतु इतिहास बदलू शकत नाही. ज्यांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला ते गाडले गेले. मोदी सरदार पटेल आमचे म्हणून ओरडत आहेत. मात्र सरदार पटेल हे काँगे्रसचे होते. गांधी हत्येनंतर त्यांनी आरएसएसवर बंदी घातली होती. हे भाजप का सांगत नाही? असा सवाल त्यांनी केला. मोदींनी तरुणांचा विश्वासघात केला. देशाचा पैसा काळा पैसा घोषित करून नोटाबंदी केली, त्यामुळे करोडो रोजगार गेले. नोटाबंदी हा ऐतिहासिक महाघोटाळा आहे. जीएसटीवरून सरकारने फसवणूक केली आहे. एक टॅक्स नसून सहा टॅकस लावले आहेत. वीज, रियल इस्टेट, पेट्रोलला जीएसटीतून वगळण्यात आले आहे. सध्याचे सरकार सत्तांध आणि अहंकारी आहे. आपल्या चुका कबुल करत नाही. याचे परिणाम भोगावे लागणार असून सध्या गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालची जमीन हालली आहे.
येत्या 13 तारखेला नागपूर विधान भवनवर काँग्रेस मोर्चा काढणार असून ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र’ असा सवाल सरकारला करणार आहे. तसेच जानेवारीमध्ये राज्यात काँग्रसच्यावतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत काँग्रेसने गुरुदासपूर, चित्रकुट, नांदेड, मालेगाव, परभणी येथे विजय खेचून आणला असून ‘ये तो सिर्फ झांकी है दिल्ली महाराष्ट्र बाकी है।’ अशी गर्जना चव्हाण यांनी केली.