अकोला । राज्यातील जलयुक्तशिवार योजनेच्या कामांमध्ये घोटाळे होणार असतील तर आधीच्या सरकारचा सिंचन घोटाळा आणि यामध्ये काय फरक काय? या कामांची चौकशी करावी लागेल. सरकारमधील जल दरोडेखोर शोधून काढू, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच याविषयीची माहिती कोणाकडे असेल तर त्यांनी शिवसेनेकडे द्यावी, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. सोमवारी ठाकरे यांनी अकोल्यातील शेतकर्याशी संवाद साधला. सत्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकर्यांसोबत आहोत, असं आश्वासनही यावेळी ठाकरे यांनी शेतकर्यांना दिले.
दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मी कर्जमुक्त होणार ही संकल्पना राबवणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. या अभियानांतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अकोल्यातील शेतकर्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. शासकीय विश्रामगृह येथे आकोट, बाळापूर आणि पातूर या तीन तालुक्यातील शेतकर्यांच्या शिष्टमंडळाशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी शेतकर्यांनी ठाकरे यांना कापसाचा हार भेट दिला. कापूस हे आमचे सोने आहे. कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कापूस, तूर खरेदी, वीज जोडणी, कर्जमाफी आदी विषयांवर शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी ठाकरे यांनी शेतकर्यांना दिली. शेतकर्यांच्या बाजूने बोललो की राजकारण करतो असं वाटतं. आजवर शेतकरी बोललाय का? ज्याच्यासाठी आम्ही बोलतो, पण आता त्या शेतकर्याने स्वत: बोलायला हवं, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधताना केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारकडून तूर खरेदीच्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. हमीभाव शेतकर्यांना मिळतो का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने काय दिले पाहिजे. या जनतेच्या अपेक्षा आहेत त्याच माझ्याही आहेत, ही टिका नाही असेही उद्धव यांनी स्पष्टीकरण दिले. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील 20 विधानसभा मतदारसंघात जाऊन ठाकरे हे शिवसेनेचे नेते, आमदार, नगरसेवक शेतकर्यांशी संवाद साधत आहेत. या अभियानाचा शेवट 19 मे ला नाशिकमध्ये नाशिकला शेतकरी मेळावा घेऊन करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी एक नवी योजना आणली जाणार आहे. त्या दिवशी शेतकरीही शिवसेनेच्या मंचावरून बोलतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या दौर्यात उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपमध्ये वाल्मिकीचे वाल्या होतात का?
भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपमध्ये वाल्मिकीचे वाल्या होतात का? असा सवाल त्यांनी पत्रकारांशी उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये आहे, असे विधान केले होते. याच विधानाची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून देत भाजपला हा टोला हाणला.