पुणे : कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. सरकारच्या कर्जमाफीवर समाधानी नाही. नियमित कर्जभरणार्यांना या कर्जमाफीतून कुठलाही फायदा नाही, असे सांगत 25 जुलैपूर्वी सरकारने कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांची भूमिका घेण्यास समर्थ असून, सरकारमध्ये राहायचे का नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने 40 लाख शेतकर्यांचा सातबारा कोरा केला आहे. त्यांची नावे वेबसाईटवर द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच लवकरच किसानमुक्ती यात्राही काढणार, असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेची कार्यकारिणी बैठक बुधवारी पुण्यात घेण्यात आली. या नंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशभरात किसानमुक्ती यात्रा काढणार
खा. शेट्टी यांना मंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सदाभाऊ आणि माझ्यात वैयक्तिक मतभेद नाही. आमच्यातील प्रतिनिधींमधून मंत्री म्हणून गेले. त्यांनी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून वागणे आवश्यक होते. तर ते भाजपचा प्रतिनिधी असल्यासारखे वागत आहे. हे योग्य नसून शिवसेनादेखील सत्तेमध्ये आहे. त्याचे मंत्री हे फक्त शिवसेना या संघटनेप्रमाणे काम करतात. तशी भूमिका घेण्याची गरज आहे, अशी भूमिका खा. शेट्टी यांनी मांडली. मध्यप्रदेशातील मन्सूर येथील सहा शेतकर्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तेथून या यात्रेस सुरुवात होणार असून, सहा कलश घेऊन 6 ते 18 जुलैदरम्यान किसानमुक्ती यात्रा काढली जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली या राज्यात ही यात्रा जाणार आहे. या माध्यमातून शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील आंदोलनामुळे देशातील शेतकरीवर्गाला प्रेरणा मिळाली असून, एखाद्या दिवशी हाच शेतकरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी भाग पडणार, असा विश्वासही खा. शेट्टी यांनी व्यक्त केला.
सदाभाऊ खोत यांच्याबद्दल समिती घेणार निर्णय
सदाभाऊ खोत यांच्याबद्दल मात्र एकटे राजू शेट्टी निर्णय घेणार नसून, त्यासाठी प्रदेशाध्यक्ष पोकळे, आमदार तुपकर यांच्यासह चार जणांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीपुढे मंत्री खोत यांना 4 जुलैपर्यंत त्यांना आपले मनोगत मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सदाभाऊ हे संघटनेत प्रमुखपदावर नसल्यामुळे यापुढचे शेतकरी संघटनेबाबतचे सर्व निर्णय स्वतः मी आणि प्रदेशाध्यक्षच जाहीर करणार असल्याचे सांगत, त्यांनी खोत यांच्याविषयीची अढी व्यक्त केली. यावेळी झालेल्या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी खोत यांच्याबद्दल नकारात्मक मते व्यक्त केल्याचे समजते.
ठळक बाबी
* सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद
* मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकर्यांना लाभ होत असेल तर शेतकर्यांमध्ये एवढा असंतोष का?
* कर्जाचे पुनर्गठण करणार्या शेतकर्यांना काय लाभ होणार याबाबत स्पष्टता नाही.
* केवळ मोठे आकडे देऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न.
* सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अजूनही तयार. 25 जुलैपर्यंत सरकारने चर्चेसाठी वेळ द्यावी. मात्र, त्यानंतर स्वाभिमानी थांबणार नाही.
* सदाभाऊ खोत यांची भूमिका येथून पुढे स्वाभिमानीची अधिकृत भूमिका मानली जाणार नाही.
* खा. राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश पोफळे हेच अधिकृत भूमिका मांडतील.
* पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार.
* त्यासाठी एका समितीची स्थापना. या समितीसमोर सदाभाऊंना संधी. बाजू मांडण्यासाठी सदाभाऊंना 4 जुलैपर्यंत मुदत.