सरकारमध्येच विसंवाद त्यांच्याशी काय संवाद साधायचे?; भाजपचे चहापानावर बहिष्कार !

0

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी परंपरेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र यावर भाजपने बहिष्कार घातले आहे. ‘सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. ते बोलतात काय आणि करतात काय?, त्यांनी आधी आपसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावे,’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला लगावला आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पत्रकार परिषद झाली.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी उपस्थित होते.

फडणवीस यांनी यावेळी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत त्यांनी अंमलात आणली. कर्जमाफीमध्ये केवळ पीककर्जाचा समावेश आहे. शेडनेट, पशुपालन अशा कर्जाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. ही फसवणूक आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारच्या चहापानाला जाऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

‘राज्यात महिलांवरील अत्याचार पराकोटीला गेला आहे. पोलीस दलाचे खच्चीकरण केले जात आहे. त्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू,’ असे फडणवीस म्हणाले.