हडपसर । रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे काम थांबवा या मागणीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हडपसर गावच्या वेसीसमोर हे आंदोलन झाले. याप्रसंगी चेतन तुपे, योगेश ससाणे, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नंदा लोणकर, रूक्साना इनामदार, अशोक कांबळे, निलेश बनकर, सागरराजे भोसले, कलेश्वर घुले, मंदार घुले, अविनाश काळे, अशोक कांबळे, प्रवीण ताथोड, अक्षय रायकर, विशाल कुदळे, डॉ.शंतनू जगदाळे आदी उपस्थित होते.
सलग आठ दिवस केलेल्या या आंदोलनात भोंगा वाजवणे, तोंडावर काळी पट्टी बांधणे, भजन, थाळी वादन, जागरण-गोंधळ, कचरा तुला, जोडो मारो आंदोलने करण्यात आले. अगोदरच या भागात चार कचरा प्रकल्प आहेत. त्यामुळे शहराचा कचरा आमच्या माथी मारू नका, असा असंतोष नागरिकांमध्ये आहे. हडपसरची कचरपेटी होऊ देणार नाही, या भावनेने हडपसरवासीयांमध्ये सत्ताधार्या विरोधात तीव्र संताप पसरला आहे.
कचरा प्रकल्पाचे काम बंद करा यासाठी सनदशीर मार्गाने महापौर व आयुक्त, पालकमंत्री आणि मुख्यंत्र्यांना गेली चार महिने लेखी, तोंडी विनंती करुन आणि आंदोलन करून विनंती केली. बहिर्या प्रशासनला व सत्ताधारी भाजप सरकारला आंदोलकांचा आवाज ऐकू येत नाही. त्यांची कानउघडणी करण्यासाठी आम्ही सलग आठ दिवस आंदोलन केले. ‘लाथो के भूत बातोंसे नही मानते’ म्हणूनच आम्ही भाजप सरकारला जोडे मारले. आता जर सत्ताधा-यांना जाग येणार नसेल तर पुढच्या काळात घनकचरा विभागाच्या गाडया आडवून फोडल्या जातील. सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने येथे कोणत्याही परिस्थीतीत कचरा प्रकल्प आम्ही होवू देणार नाही. यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची नागरिकाची भूमीका आहे.
– योगेश ससाणे,
प्रभाग समिती अध्यक्ष, हडपसर