सरकारला धोका नाही; अनेक ‘अदृश्य हात’ पाठिशी!

0

मुंबई : राज्यातील आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. तशी परिस्थिती आलीच तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी पुढे येतील, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अदृश्य हात असल्याचा गौप्यस्फोट करून शिवसेनेला एकप्रकारे ‘अदृश्य’ इशाराच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. ’एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सरकार पाच वर्षे पूर्ण करेल!
भाजप-शिवसेना युती सरकारमधील कुरबुरी आणि शिवसेनेकडून वारंवार दिल्या जाणार्‍या राजकीय भूकंपाच्या इशार्‍याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आहेत. काही मुद्द्यांवर आमचे वाद होतात. अंतर्विरोध असतो. पण तो तात्पुरता असतो. आम्ही गुण्यागोविंदाने सरकार चालवत असून, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेला वगळूनही महाराष्ट्रातून भाजपला 145 मते मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील सरकार चालवण्यासाठी भाजपला आता शिवसेनेची गरज नाही, अशी चर्चा आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेला वगळूनही राज्यातून आम्हाला 145 मते मिळाली हे आम्हाला मीडियातूनच कळले. आम्ही तसा विचारही केला नव्हता. शिवसेना आमच्यासोबत आहे हेच वास्तव आहे. त्यामुळे नकारार्थी विचार करण्याची गरज नाही. सरकार पडण्याचीच वेळ आली तर अनेक अदृश्य हात पुढे सरसावतील, याची मला खात्री आहे. अर्थात, तो हात काँग्रेसचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.