सरकारला रामायणकार वाल्मिकींचा विसर – अनंत तरे

0

सुप्रिया सुळे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते तरे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

लोणावळा : सध्या अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे, त्यासाठी पण देखील केला गेला आहे. परंतु, ज्यांनी रामायण लिहिले त्या वाल्मिकी महर्षिंना आपण विसरलो आहे. त्यांना कदापि विसरून चालणार नाही, असे मत महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनंत तरे यांनी वाल्हे येथे व्यक्त केले. ज्याप्रमाणे देशभरात महापुरुषांची वेगवेगळी स्मारके उभी रहात आहे, त्याच धर्तीवर रामायनकार महर्षी वाल्मिकी यांचे स्मारक उभे रहावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

रामायणकार महर्षि वाल्मीकी ऋषिंच्या वाल्हे येथील संजीवन समाधीस्थळी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळा दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी, महर्षींच्या संजीवन समाधीवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आयोजित मेळाव्यात अनंत तरे यांना सिद्धिविनायक फाऊंडेशन, बारामती यांच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जयंती साजरी होत नसल्याची खंत…
वाल्मिकी जयंती शासकीयस्तरावर साजरी करावी, असे आदेश असताना ती साजरी केली जात नाही. वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेला एक साधा हार देखील घातला जात नाही, हे दुर्दैव आहे. राम नवमीच्या सुट्टी मिळते. पण ज्यांनी रामायण लिहिले त्यांच्या जयंती निमित्त सुट्टी मिळत नाही, अशी खंत अनंत तरे यांनी व्यक्त केली.

वाल्हे देवस्थानचा ‘क’ वर्गात समावेश…
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी रामायण ही केवळ एक कथा नसून, रामायण हे एक संस्कार असल्याचे प्रतिपादन केले. याचवेळी ठाकरे आणि पवार कुटुंबीय यांच्यामधील स्नेह कसा हे सांगताना राजकारण करताना वैयक्तिक संबंधात केव्हाही कटुता येऊ देऊ नये, असा सल्ला उपस्थितांना दिला. तर, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी देवस्थानसाठी 10 लाखाचा निधी जाहीर करताना कायद्याच्या चौकटीत राहून कोळी समाजासाठी जे जे करता येईल. ते ते सर्व करेल, असे आश्‍वासन दिले. तर जलसंपदा व जलसंवर्धन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी वाल्हे देवस्थानचा समावेश ’क’ वर्ग देवस्थान मध्ये करण्यात आल्याचे सांगत देवस्थानच्या विकासासाठी आगामी अर्थसंकल्पात पॅकेज जाहीर करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती…
जयंती उत्सवाला महाराष्ट्र साहित्य पुणे शाखेचे संचालक रावसाहेब पवार, प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, जि.प. सदस्य शालिनी पवार, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, माजी पं.स. सभापती गिरीष पवार, एकविरा देवस्थान विश्‍वस्त मदन भोई, नवनाथ देशमुख, विलास कुटे, भाजप तालुकाध्यक्ष सचिन लांबाते, सिद्धेश्‍वर कोळी यांच्यासह संपूर्ण राज्यातून आलेले हजारो कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.