सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम!

0

भिडेंना अटक झाली नाही तर मला माहिती आहे कोणाच्या शेपटीवर कधी पाय द्यायचा : प्रकाश आंबेडकर
कोर्टाचे काम करू नका; आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले

मुंबई । देवेंद्र फडणवीस सरकारने संभाजी भिडे आणि रावसाहेब पाटील यांना अटक करावी. जर आठ दिवसांत भिडेंना अटक झाली नाही तर आम्हालाही माहिती आहे, की कोणाच्या शेपटीवर कधी पाय द्यायचा अन् कोणती प्रकरणे कधी बाहेर काढायची, अशा शब्दांत भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. सरकारने त्यांचे काम करावे, कोर्टाचे काम करत बसू नये, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘भीमा कोरेगाव प्रकरणात अपेक्षित मृतांचा आकडा गाठू शकलो नाही आणि मुख्यमंत्र्यांनाही मारले पाहिजे,’ असे वादग्रस्त वक्तव्य असणारी रावसाहेब पाटलाची फेसबुक पोस्ट होती, त्यावर संभाजी भिडेचा फोटो होता. संभाजी भिडे आरोपी नंबर 1 आहेत, तर एकबोटे आरोपी क्रमांक 2 आहेत. त्यामुळे आठ दिवसांच्याआत सरकारने भिडेला अटक केली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

…तर मुख्यमंत्र्यांना अटक करा
संभाजी भिडेंना अटक करणे शक्य होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. एल्गार रॅलीत सहभागी झालेले श्रीमंत कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संभाजी भिडेंना अटक न करण्याच्या षडयंत्रामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच्या संशयाला वाव आहे, असे कोकाटे म्हणाले. त्यामुळे संभाजी भिडेंना अटक होत नसेल, तर मुख्यमंत्र्यांना अटक केली पाहिजेे, अशी मागणी कोकाटेंनी केली आहे. दुसरीकडे, आमची अपेक्षा होती एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडेंना अटक होईल, पण सरकारकडून हालचाल नाही, असे भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. सरकारने लोकशाहीचा गळा दाबला, अशी टीकाही त्यांनी केली. आमचे यापुढचे टार्गेट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. कारण संभाजी भिडे यांची अटक टाळण्यासाठी त्यांचाच दबाव आहे. म्हणून यापुढील आंदोलनाचे लक्ष्य ते राहतील, असे ते यावेळी म्हणाले.

रावसाहेब पाटलाची खळबळजनक पोस्ट
संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून एल्गार मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक आले असून, या मोर्चाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना शिष्टमंडळासह चर्चेसाठी आमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. संभाजी भिडेंना गुरू मानणार्‍या त्यांच्या संघटनेतील रावसाहेब पाटील नामक एका व्यक्तीने समाजमाध्यमांवर भीमा कोरेगाव घटनेसंबंधी गंभीर मजकूर लिहिला आहे. भीमा कोरेगाव येथे आम्हाला अपेक्षित असलेला मृतांचा आकडा आपण गाठू शकलो नाही, अशा आशयाचा हा मजकूर असून मुख्यमंत्र्यांनाही मारायला हवे, असे चिथावणीखोर वक्तव्यही या रावसाहेब पाटील यांनी फेसबुकद्वारे केल्याची खळबळजनक बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. चिथावणीखोर वक्तव्य केल्याबाबत अगोदर या रावसाहेब पाटीलवर आणि त्याच्या माध्यमातून भिडेंवर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच सर्व बाबी स्पष्ट असतानाही जर पोलिस भिडेंवर कारवाई करत नसतील, तर पोलिस यंत्रणाच बरखास्त करावी, अशी संतप्त मागणी केली.

पंतप्रधान भिडेला वाचवित आहेत!
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठीशी घालत आहेत, त्यामुळेच राज्य सरकार भिडेंवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा खळबळजनक आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र सध्या आम्हाला पंतप्रधानांशी भांडायचे नसून भिडेंना अटक हा आमचा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिला आहे.