मुंबई: आज मनसेचा मेळावा आहे. मनसेकडून आता नवीन राजकीय भूमिकेला सुरुवात केली जात आहे. मनसेच्या नवीन ध्वजाचे आज अनावरण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुरुवारी नवीन ध्वजाचे अनावरण केले. दरम्यान मनसेने राज्य सरकारवर आणि त्यांच्या कामकाजावर करडी नजर ठेवण्यासाठी रणनीती आखली आहे. राज्य सरकारच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी मनसे शॅडो कॅबिनेट स्थापन करणार आहे. शॅडो कॅबिनेटची आज दुपारी घोषणा होणार आहे. त्यात पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. प्रत्येक मंत्रालयासाठी मनसेचा एक पदाधिकारी शॅडो कॅबिनेट म्हणून काम करणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेने सरकार स्थापन केल्याने विरोधी पक्ष म्हणून एकमेव भाजप हाच पर्याय जनतेसमोर असल्याने मनसेने देखील विरोधी पक्षाची भूमिका बजाविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने पक्षाला मजबूत करण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या मेळाव्याकडे साऱ्या राज्याच्या लक्ष लागले आहे.
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेता आणि सरचिटणीस यांना संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा मनसे नेते पाठपुरावा करतील. हे सर्व नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड देतील.