मुंबई/नाशिक : प्रतिनिधी : शेतकर्यांच्या, सामान्यांच्या प्रश्नांवर संघर्ष कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा 16 जानेवारीपासून मराठवाड्यात सुरु होणार आहे. या आंदोलनाचा समारोप 31 जानेवारीरोजी ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी दिली. मुंबई येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुसरीकडे, शेतकर्यांना कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी येत्या दि. 16 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अंतिम चर्चा करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलनाची हाक समिती देणार असल्याने राज्य सरकार समोरील अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
पवारांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाशी संबंध असलेल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. फडणवीस फॉर सीएम नावाच्या फेसबुक पेजवरून पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्या त्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाचा आम्ही धिक्कार करत असून, त्याच्याविरोधात न्यायालयीन कारवाई केली जाणार आहेच शिवाय मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आ. तटकरे यांनी केली. शरद पवार यांच्याविषयी फडणवीस फॉर सीएम या विकृत मनोवृत्तीची पोस्ट टाकण्यात आली, त्याबद्दल तटकरे यांनी संताप व्यक्त केला. फेसबुकवर आलेल्या त्या आक्षेपार्ह पोस्टबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली आहेच; शिवाय पक्षाच्यावतीने यावृत्तीविरोधात कडक पावले उचलली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध
पत्रकार परिषदेत आ. सुनील तटकरे यांनी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची निंदा करत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भीमा-कोरेगावची दुर्दैवी घटना घडली. काही जातीयवादी लोकांनी जाणीवपूर्वक तणावपूर्ण वातावरण निर्माण कररून हे कारस्थान केले आहे. जनतेला विनंती आहे की परस्परातील सामंजस्य आणि महाराष्ट्रातील शांतता राखण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशी झाल्यानंतरच खरी गोष्ट बाहेर येईल. राज्यात शांतता पाळली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
…तर 1 मार्चपासून असहकार आंदोलन
दुसरीकडे, नाशिक येथे झालेल्या बैठकीबाबत बोलताना पदाधिकार्यांनी सांगितले, की राज्य सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास दि. 1 मार्चपासून सरकारशी ’असहकार आंदोलन’ पुकारण्यात येईल. येथील विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीला शेतकरी नेते रघुनाथ पाटील आणि प्रतिभा शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यातील सरकार हे शेतकरीविरोधी असून, राज्यात अराजकता माजली असल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना आमदारांची पगारवाढ, कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग देण्यात सरकार दंग आहे. आमच्या पैशांवरच ही मजा सुरू असल्याची टीका करतानाच शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.