सरकारी कर्मचार्‍यांचा हल्लाबोल

0

मुंबई । राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्य सचिव यांच्याकडून चर्चेसाठी पाचारण झाले असले, तरी मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करण्याचा आग्रह कर्मचार्‍यांनी धरला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास व मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ केल्यास दोन दिवसांचा राज्यव्यापी संप करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना ते राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाची घरे देण्यात यावीत, मृत्यूनंतर पाल्यास विनाअट अनुकंपा सेवाभरती करावी, सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या एका पाल्यास सेवेत सामावून घ्यावे, वैद्यकीय कारणास्तव अपात्र कर्मचार्‍याच्या एका पाल्यास सेवेत घ्यावे या व अन्य मागण्यांबाबत हा मोर्चा आयोजित करण्यात आला. याबाबत शासकीय स्तरावरून वेळोवेळी केवळ आश्‍वासने दिली गेली. मात्र, कुठलीच कारवाई न झाल्यामुळे कर्मचारी वर्गाचा असंतोष या आंदोलनातून दिसून आला. आता दोन दिवसांचा राज्यव्यापी संपाचा इशारा भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.