जॅमर लावल्याने पिकअप चालकाची पोलिसांसोबत हुज्जत
हिंजवडी : नो पार्किंग परिसरात वाहन पार्क केल्याने पोलीसांनी लावलेले जॅमर काढण्यासाठी पोलीसांसोबत हुज्जत घालून अरेरावी केल्याचा प्रकार हिंजवडीत घडला. याप्रकरणी, दोन जणांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजी चौक येथे घडली. हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस नाईक अमोल जनार्दन बनसोडे (वय 32) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणपत पांडुरंग मालपोटे (वय 45, रा. कातरखडक, ता. मुळशी) याला अटक झाली आहे. त्याच्यासोबत किरण छबन मालपोटे (वय 30) याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न…
हे देखील वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नो पार्किंग परिसरात वाहने लावणार्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शिवाजी चौकातील जांभुळकर बिल्डिंग समोरील रोडवर पीएमपीएमएल बस स्टॉप समोर नो पार्किंग करण्यात आले आहे. त्या ठिकाणी तशी सूचना देणारा फलक देखील लावण्यात आला आहे. तरीही आरोपींनी त्या ठिकाणी त्यांचा पिकअप (एमएच 14 / ईएम 7080) टेम्पो पार्क केला. त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक विभागाचे पोलीस नाईक अमोल बनसोडे यांनी आरोपींच्या पिकअपल जॅमर लावला.
दंड न भरल्याने कारवाई…
आरोपींनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले असताना त्याबाबत रीतसर दंड भरण्याऐवजी आरोपी गणपत ’जॅमरची पावती करणार नाही. तसेच आरोपी किरण याने ’कसले चलन, पहिले तू जॅमर काढ’ असे म्हणत दोघांनी मिळून अमोल बनसोडे यांच्याशी हुज्जत घातली. यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमोल बनसोडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.